कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिर्डी बसस्थानक पडले ओस, साई भक्तांचे हाल

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिर्डी बसस्थानक पडले ओस, साई भक्तांचे हाल

शिर्डी | शहर प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा फटका शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या साई भक्त प्रवाशांना बसला असून तसेच बसेस नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

प्रवाशांचा लालपरीवर विश्वास असल्याने तासंतास अनेक प्रवाशी वाट बघत होते. मात्र बसेस नसल्याने अनेकांना मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करून घरचा रस्ता धरावा लागला आहे.

दरम्यान दीपावलीच्या सुट्ट्या निमित्त शिर्डीत साई भक्तांची गर्दी वाढली असून देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत आले आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने बससेवा अनेक ठिकाणी खंडित व विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका शिर्डीत आलेल्या साईभक्त प्रवाशांना बसल्याचे दिसून येत आहेत.

शिर्डी बस स्थानकाचा विचार केला तर जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात राज्यासह परराज्यांतील महामंडळाच्या सुमारे ४५० बस गाड्यांच्या फेऱ्या असतात, मात्र संपाच्या पार्श्वभूमीवर मुक्कामी असलेल्या फक्त २७ गाड्यांच्या फेऱ्या माघारी परत गेल्या. प्रवाशांचा लाल परिवार मोठा भरोसा असतो, त्यामुळे प्रवासासाठी शिर्डीत आलेले साईभक्त सुरक्षिततेच्या दृष्टीने लालपरीला पहिली पसंती प्रवासासाठी देत असतात. परंतु लालपरीच नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

एरवी बघितले तर शिर्डी बस स्थानकावर शेकडो बस गाड्या उभ्या असतात, अगदी बसेस लावण्यावरून चालकांमध्ये हमरीतुमरी होत असते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शिर्डी बसस्थानक एसटी अभावी ओस पडल्याचे दिसत होते. तर खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहने खचाखच प्रवाशांनी भरून जातांना दिसून आले. एसटीच्या संपाचा फायदा उचलत खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या प्रवास भाड्यामध्ये दुप्पटीने भाडेवाढ करून प्रवाशांना आर्थिक फटका दिला आहे. एसटीचा संप केव्हा मिटतो याच प्रतीक्षेत अनेक नागरिक आहेत.

दीपावली सणासुदीत निमित्त जाणाऱ्या माहेरवासी महिलांना सुद्धा लालपरीची सुविधा पुन्हा पुर्ववत केव्हा सुरू होते याची आस लागली आहे. एकंदरीत एस.टी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा दिपावली सणानिमित्त शिर्डीत आलेल्या साईभक्तांना व भाऊबीजेसाठी माहेराला जाणाऱ्या महिला भगिनींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com