शिर्डी : महावितरणने कनेक्शन तोडणे न थांबविल्यास उपोषण

शिर्डी नगरपंचायत नगरसेवकांचा इशारा
शिर्डी : महावितरणने कनेक्शन तोडणे न थांबविल्यास उपोषण

शिर्डी (शहर प्रतिनिधी) / Shirdi - शिर्डी शहराची अर्थव्यवस्था करोना महामारीने ढासळली असून अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असतांंना महावितरण कंपनीने वीज वसुलीपोटी शहरात वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला असून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने त्वरित थांबवावी अन्यथा याविरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. पाटील यांना निवेदनाद्वारे शिर्डी नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, करोना महामारीने शिर्डीतील अर्थव्यवस्था पुर्णपणे ठप्प झाली आहे. साई मंदिर अजूनही भक्तांना दर्शनासाठी बंद आहे. शहरातील दुकाने व व्यवसाय सुरू नसल्याने सर्व शिर्डीकर त्रस्त आहेत. अनेक नागरिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच आपण वीज बिलापोटी वीज कनेक्शन बंद करत आहात. त्यामुळे आपण वीज कनेक्शन बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबवावी, अशी विनंती या निवेदनात केली आहे.

वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवली नाही तर लोकशाहीचा आधार घेऊन आम्हाला उपोषणास बसावे लागणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, नगरपंचायतीच्या सभापती छायाताई शिंदे, सभापती अंजलीताई गोंदकर, नगरसेवक रवींद्र कोते आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनाच्या प्रती राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, अधीक्षक अभियंता अहमदनगर, कार्यकारी अभियंता संगमनेर यांना पाठविण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com