
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
पुणतांबा गावात महावितरण वीज कपनीने अंदाजे 6 कोटी रुपयांची थकित वीज बिले वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली असून या मोहिमेला वीज ग्राहकांचा अत्यंत सकात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती येथील कनिष्ठ अभियंता शितल जाधव यांनी दिली.
परिसरात शेतकी ग्राहकांनी चालू 58 लाख रुपये थकित असून मागील थकीत रक्कम विचारात घेता ही रक्कम 6 कोटी रुपयापर्यंत आहे. थकित वसुलीसाठी गोदावरी नदीकाठची 6 जनित्रे बंद केली. ही जनित्रे बंद होताच वीज ग्राहकांनी लगेच थकित रक्कम भरली तसेच उरलेली रक्कम 10 दिवसात भरण्याचे आश्वासन दिले. गावातील आकडे टाकून तसेच वीज चोरीच्या प्रकरणाबाबत आम्ही धडक कारवाई करून कोणाच्याही दडपणाला न जुमानता गुन्हे दाखल करणार असल्याचे श्री. जाधव यांनी आर्वजून स्पष्ट केले.
दरम्यान पुणतांबा परिसरात आकडा टाकून वीज वापरण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे विजेच्या दाब कमी होऊन शेती व नियमित विज बिले भरणार्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महावितरणने याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास त्यांच्या कार्यालयासमोर धडक आंदोलन करण्याचा इशारा येथील असंख्य वीज ग्राहकांनी दिला आहे.