अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत दमडीही न भरणार्या वीज ग्राहकांना आता सोमवारपासून वसुलीचा करंट दिला जाणार आहे.

नगर शहरातील 81 हजार वीज ग्राहकांपैकी 32 हजार ग्राहकांनी दहा महिन्यांत वीजबिलाला केराची टोपली दाखविली. शहरातील ग्राहकांकडे 34 कोटी रूपयांची थकबाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोवीडच्या काळात घराघराचे अर्थचक्र थांबले गेले. त्याचा विचार करत सरकारने वीज बिल भरण्यास सवलत देऊ केली. थकबाकीदारांची वीज काटू नका असे आदेश दिले. आता मात्र ते आदेश रद्द करत वसुलीसाठी वीज काटाकाटी सुरू करण्याचे निर्देश महावितरणच्या मुंबई कार्यालयाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला दिले आहेत.

नगर शहरात सोमवारपासून महावितरण कंपनीकडून वसुली मोहीम सुरू केली जाणार आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक असे तीन प्रकारचे ग्राहक असून त्यांची एकूण संख्या ही 1 लाख 26 हजार 638 इतकी आहे. यातील 81 हजार ग्राहकांकडे 34 कोटी रूपयांची थकबाकी आहेत. कोरोना संकटात रुपयांचाही भरणा न केलेल्या ग्राहकांचे वीज कनेक्शन काटण्याची मोहीम सोमवारपासून सुरू केली जाणार आहे. ज्यांनी हप्ते पाडून बील भरले त्यांच्याकडे दुसरे बील भरण्यासाठी तगादा केला जाणार आहे.

10 महिन्यांत तिप्पट वाढ

नगर शहरातील सव्वा लाख ग्राहकांकडे मार्च 2020ला 10 कोटी रुपयांची थकबाकी होती. दरमहा वसुलीचा आकडाही 16 कोटींच्या आसपास होता. लॉकडाऊननंतरच्या दहा महिन्यांत थकबाकीचा आकडा तिप्पटीने वाढत 34 कोटींवर पोहोचला. वसुलीची टक्केवारी 8 कोटींवर घसरली. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना वसुली वाढवून 10 कोटींच्या घरात गेली. आता ती 15 कोटींवर नेण्याचे टार्गेट महावितरणने आखले आहे.

32 हजार ग्राहकांनी दमडीही भरली नाही

थकबाकीदार असलेल्या 81 हजार ग्राहकांपैंकी 32 हजार घरगुती ग्राहकांनी मार्च 2020 पासून एक रुपयांचेही बिल भरलेले नाही. नगरकर महिन्याकाठी 15 ते 16 कोटी रुपयांच्या वीजेचा वापर करतात. कोवीडच्या काळात 7 ते 8 कोटी रूपयांची वसुली होत होती. आता ती 10 कोटीच्या पुढे गेली आहे. वसुलीचा हा आकडा 14 कोटीच्या पुढे जाण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे समजते.

महापालिकेकडे दोनशे कोटी थकीत

नगर महापालिकेचे पथदिवे, मुख्य कार्यालय, उपकार्यालये, पाणी पुरवठा असे 7 कनेक्शन आहेत. महापालिकेने मार्च 2020 मध्ये नियमीत वीज बिल भरणा केली. त्यानंतर आतापर्यंत एक रूपयाचाही भरणा केलेला नाही. महापालिका दरमाह सुमारे 4 कोटी रूपयांची वीज वापरते. मार्चपूर्वी 180 कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यात आता भर पडून ती दोनशे कोटीवर गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ही वसुली करण्यासाठी महावितरण कंपनीकडून महापालिकेला नोटीस बजावली जाणार आहे. नोटीस दिल्यानंतरही थकबाकी न भरल्यास मात्र वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला जाईल असे शहराचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांनी ‘नगर टाइम्स’शी बोलताना सांगितले.

थकबाकीदार ग्राहकांची यादी तयार झाली आहे. सोमवारपासून वसुली मोहीम राबविली जाईल. जे भरणार नाहीत त्यांचे कनेक्शन कट केले जाईल. कनेक्शन कट करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी बाकी भरून सहकार्य करावे.
- नितीन धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता, नगर शहर विभाग.

शहराचे थकबाकीदार

घरगुती - 34000, व्यावसायिक - 4500, औद्योगिक - 257

शहरातील कनेक्शन- 126638, थकबाकीदार 81384