महावितरणाच्या कृपेने पुणतांबा परिसरात पाणी पातळी स्थिर

महावितरणाच्या कृपेने पुणतांबा परिसरात पाणी पातळी स्थिर

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

उन्हाळ्याची तीव्रता तसेच मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झालेला असतांनाही पुणतांबा परिसरात विहिरींच्या पाण्याच्या पातळीत फारशी घट झालेली नाही.

गोदावरी नदीकाठच्या विहीरींच्या पाण्याचा अद्याप ही उपसा होत नाही याचे कारण म्हणजे अहिल्याबाई होळकर घाट व बोरबने भागात अद्यापही नदीपात्रात पाणी आहे. वाड्या वस्त्यांवर सुद्धा अद्यापही पाणीटंचाई जाणवत नाही. परिसरात भूगर्भातील पाण्याची पातळी स्थिर राहण्याचे कारण म्हणजे चालू वर्षी परिसरात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले. परिसरातील ओढे, नाले, बंधारे, चर हे पावसाळ्यात दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीत पाण्याने दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली होती.

त्यातच गेल्या तीन महिन्यापासून परिसरात वीज पुरवठ्यात सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे विस्कळीतपणा येत होता. त्याचा परिणाम पाण्याच्या उपशावर झाला आहे. कमी प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्यामुळे बहुतांशी विहिरींमध्ये पाण्याची पातळी स्थिर राहिलेली आहे.

पुणतांबा परिसर हा उसाचा बालेकिल्ला समजला जातो. चालू वर्षी अद्यापही अनेक ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस तोडी अभावी शेतात उभा आहे. ज्यांचा ऊस तोडून नेण्यात आला आहे त्यातील बहुतांशी शेतकर्‍यांनी उसाचे खोडवा पीक ठेवले नाही. त्याचाही परिणाम पाण्याच्या उपशावर झाला आहे. 24 मे पासून रोहिणी नक्षत्राची सुरुवात होते. चालू वर्षी मान्सूनचे 10 दिवस अगोदर आगमन होण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. तसे झाले तर पुणतांबा परिसरात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता फारच कमी आहे.

Related Stories

No stories found.