महावितरणाच्या भारनियमनाचा फार्स शेतकर्‍यांच्या मुळावर

महावितरणाच्या भारनियमनाचा फार्स शेतकर्‍यांच्या मुळावर

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

महावितरणाचा भारनियमनाचा झाला फार्स, वीज नाही खेळ खल्लास, अशी अवस्था सध्या राहुरी तालुक्यात झाली आहे. ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या प्रचंड भारनियमनामुळे जनता हैराण झाली आहे.

सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने 44 अंशावर गेलेले तपमान, त्यामुळे अंगाची होणारी लाहीलाही आणि सर्वात भर टाकण्याचे काम सध्या महावितरण करत आहे. ऐन उन्हाळ्यात विजेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. वीज भारनियमनाच्या नावाखाली शेतीला आठ तासापैकी अवघा दोन ते तीन तास वीजपुरवठा होत असल्याने विहिरी व कुपनलिकांना पाणी असून देखील डोळ्या देखत पिके जळून चालल्याने ’आई जेऊ घालीना, अन् बाप पोटभरु देईना’ अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे.

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात महावितरणने शेतीपंपाच्या वीजबिलाची सक्तीने वसुली केली. बिल न भरणार्‍या शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. वीज रोहित्र बंद ठेऊन मोठ्या प्रमाणात वीजबिल वसुली करण्यात आली. ज्याप्रमाणे वसुली करण्यात आली, त्याप्रमाणे शेतकर्‍यांना वीजपुरवठा करणे गरजेचे होते. परंतु एप्रिल महिना उजाडताच विजेचा खेळखंडोबा सुरु झाला. उन्हाची तिव्रता प्रचंड वाढल्याने तापमान 44 अंशावर गेले. पाण्यावाचून पिके आडवी पडू लागली. वीजभारनियमनाच्या नावाखाली रोज वेळ वाढविण्यात आली. यामध्ये देखील अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने व उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असल्याने जादा भार होऊन धडाधड वीजरोहित्र जळत आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत मोटारी जळत आहेत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे.

रात्री पावणे बारा वाजता वीज येत असल्याने एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे पिकांना पाणी देणे गरजेचे असल्याने शेतकर्‍यांना जिवावर उदार होऊन रात्री अपरात्री शेतात जावे लागत आहे. परंतु तिथं गेल्यावर देखील दुर्दैव पाठ सोडत नाही. वाफ्यात पाणी जात नाही तेच वीज पुन्हा गायब होते. विजेचा सारखा लपंडाव सुरू असतो. रात्रभर जाऊन पाणी भरत असताना पहाटे पहाटे डोळा लागला तर पहाटे वीज जाते, ती पुन्हा सकाळीच येते. त्यावेळी पुन्हा भारनियमनाची वेळ सुरू झाल्याने सिंगल फेज सुरू होते. असा खेळ रोज सुरू आहे. यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून विजेअभावी पाण्यावाचून डोळ्यादेखत पिके जळून चालल्याने त्याचे काळीज तिळतीळ तुटत आहे.

ही सर्व कसरत सुरू असताना मात्र, सिंगल फेजची अवस्था देखील अत्यंत वाईट आहे. दिवसभर अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पंखे, कुलर, फ्रिज देखील व्यवस्थित चालत नसल्याने प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यातच रात्री-अपरात्री कधीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने झोपेचे खोबरे होत आहे, अशी बिकट अवस्था झाली आहे. या सर्वांचा उद्रेक झाला असून याचा कधीही स्फोट होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्फोटाला कुठल्याही क्षणी महावितरणला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विजेच्या खेळखंडोब्यामुळे नागरिक सारखे फोन करत असल्याने महावितरण अधिकार्‍यांनी फोन स्वीच ऑफ केले आहेत. तर काहींनी नंबरच बदलले आहेत. यामुळे नागरिक आणखी चिडले आहेत.

Related Stories

No stories found.