महावितरणचा कोळपेवाडी सोलर प्लँट एक वर्षापासून बंद

महावितरणचा कोळपेवाडी सोलर प्लँट एक वर्षापासून बंद

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील कोळपेवाडी येथील 33/11 केव्ही महावितरण सबस्टेशन मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत एक मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा पॅनल प्रकल्प एक वर्षापासून बंद असल्याने कंपनीने सदर योजनेला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

एनर्जी एफिशिएंशी सर्व्हीसेस लिमिटेड कंपनीने 18 कोटी रुपये खर्चून 3 एकराच्या पुढील जागेवर 29 सौर ऊर्जा पॅनल बसवून प्रतिदिन एक मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट कंपनीने आखून जून 2019 मध्ये प्रकल्प कार्यान्वीत केला. वर्षभर विजेचे उद्दिष्ट कंपनीने जेमतेम गाठले. त्यानंतर कधी चालू तर कधी बंद अशी प्रकल्पाची अवस्था होऊन फेब्रुवारी 2022 पासून प्रकल्पातून एक युनिट देखील ऊर्जा निर्मिती कंपनीला करता आली नाही. मात्र योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हे गोंडस नाव देत प्रकल्पाची उभारणी केली.

आजमितीला देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे पॅनलवर धूळ साचलेली आहे. काटेरी झुडूप व वाळलेल्या गवताचा वेढा पॅनलभोवती झाला आहे. असेम्ब्ली डीसी केबल जळालेल्या अवस्थेत असून स्टेपअप ट्रान्सफार्मर भोवती झाडे झुडूपे वाढलेली आहेत. परिसराची स्वच्छता न झाल्याने सरपटणार्‍या विषारी सापाचा वावर आढळून येत आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाळलेल्या गवताने पेट घेतल्यास मोठी आर्थिक हानी होऊन कोळपेवाडी महावितरण कंपनीस धोका उद्भवू शकतो.

याबाबत कोपरगाव ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य यांनी सांगितले की, हा प्रकल्प चालू होण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून कंपनीने संपूर्ण परिसराची स्वच्छता करून देणे अपेक्षित आहे. मेंटेनस एजन्सी नेमलेली नसल्याने हा प्रकल्प धूळ खात बंद पडलेल्या अवस्थेत आहे. शेतकर्‍यांना पूर्ण दाबाने वीज उपलब्ध व्हावी हा योजने मागील उद्देश होता. कंपनीने महाराष्ट्र राज्यात उभारलेल्या सर्व प्रकल्पाचा आढावा उर्जा मंत्रालयाने घेऊन बंद स्थितीतील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत केल्याशिवाय दुसरे प्रकल्प उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येऊन शेतीला पूर्ण दाबाने दिवसा वीज मिळावी हा विषय सातत्याने ऐरणीवर येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com