महावितरण कंपनीचा अजब फंडा

महावितरण कंपनीचा अजब फंडा

वीज मिटरवाला उपाशी तर अनधिकृत आकडेवाला तुपाशी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

घराघरांत विजेचा दिवा आला असल्याने विजेचा वापर वाढला आहे. मात्र अधिकृत वापरापेक्षा अनधिकृत वापर भरमसाठ होत असल्याने विजेच्या टंचाईला अधिकृत ग्राहकाला सामोरे जावे लागत आहे. अनधिकृत वापरावर कारवाई होत नाही. महावितरणच्या अजब फंड्यामुळे अधिकृत वीज मिटरवाला उपाशी तर अनधिकृत आकडेवाला तुपाशी, अशी अवस्था झाली आहे.

रोजच्या जीवनात वीज हे सर्वात स्वस्त इंधन म्हणून वापरले जात आहे. काही वर्षात प्रत्येक घराघरांत वीज पोहचली आहे. अधिकृत वीज वापरासाठी सरकारकडून दुर्बल घटकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून प्रभावीपणे या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अनधिकृत वापराला अद्यापपर्यंत आळा बसलेला नाही. वीज गळतीचा भार सातत्याने अधिकृत वीज वापर करणार्‍या ग्राहकांवर पडलेला दिसून येत आहे. महावितरणकडून अनधिकृत वापरावर कारवाई होत नसल्याने तेथे मनसोक्त विजेचा वापर केला जात आहे. त्यामानाने अधिकृत वीज वापर करणारा ग्राहक जास्त वीज बील येऊ नये म्हणून विजेचा वापर काटकसरीने करीत असल्याचे दिसून येते.

सध्या मार्चअखेर सुरु असल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांची थकित वीज बिल वसुलीची धूम सुरू आहे. घरगुती व व्यापारी ग्राहकांकडील छोट्या छोट्या थकित वीज बिलासाठी महावितरणचे कर्मचारी अधिकृत वीज वापर करणार्‍या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडताना दिसत आहेत. उष्णतेचा पारा चढल्याने वीजजोडणी कट केल्याने उकाड्याचा त्रास अधिकृत ग्राहकांना सोसावा लागत आहे. याउलट अनधिकृत घरगुती वीज वापर करणारा रेकॉर्डवरच नसल्याने व त्याचे वीज बीलच थकबाकीच्या यादीत नसल्याने उकाड्यात तो मनसोक्त विजेचा उपभोग घेत आहेत.

अनेक ठिकाणी अधिकृत ग्राहकांच्या काही पट अनधिकृत ग्राहकांची संख्या आहे. अधिकृत ग्राहकांपेक्षा अनधिकृत ग्राहकांना सेवा चांगली मिळत असल्याने अधिकृत ग्राहकांचीही मानसिकता बदलत असल्याचे काही ग्राहक बोलून दाखवत आहेत. स्थानिक कर्मचार्‍यांना हे सर्व ज्ञात असतानाही कारवाई होत नसल्याने अधिकृत मिटरद्वारे वीज वापर करणारा ग्राहक उपाशी तर अनधिकृत आकडा टाकून वीज वापर करणारा तुपाशी, अशी अवस्था पहावयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com