थकबाकीदारांना 'झटका'

थकबाकीदारांना 'झटका'

४ हजार ९८० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

अहमदनगर | Ahmednagar

महावितरणच्या नाशिक परिमंडलातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सेवा व ईतर वर्गवारीच्या ६ लाख १८ हजार ७६ ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असुन यामध्ये अहमदनगर मंडळातील २ लाख ७० हजार ८०३ ग्राहकांकडे ४५८ कोटी २ लाख रुपये थकबाकी आहे.

महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे अहमदनगर मंडलात मार्च २२ या महिन्यात ४ हजार ९८० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या अहमदनगर मंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण २ लाख ३३ हजार ५३० ग्राहकांकडे २४ कोटी २७ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील २२ हजार ४५७ ग्राहंकांकडे ६ कोटी ८३ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील ५ हजार ८१९ ग्राहकांकडे ५ कोटी ३८ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील ३ हजार ५९९ ग्राहकांकडे ३५३ कोटी ८५ लाख, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ६५८ ग्राहकांकडे ६४ कोटी ६२ लाख, सार्वजनिक सेवा योजनेतील २ हजार ६३२ ग्राहकांकडे २ कोटी ७५ लाख, इतर वर्गवारीतील १ हजार १०८ ग्राहकांकडे ३२ लाख असे एकूण अहमदनगर मंडळात सर्व वर्गवारीतील २ लाख ७० हजार ८०३ ग्राहकांकडे ४५८ कोटी २ लाख रुपये थकबाकी आहे तसेच नाशिक व मालेगाव मंडळाअंतर्गत वरील सर्व वर्गवारीतील ३ लाख ४७ हजार २७३ ग्राहकांकडे ३२० कोटी ३७ लाख रुपये थकबाकी आहे अशी एकूण नाशिक परीमंडलात एकूण ६ लाख १८ हजार ७६ ग्राहकांकडे ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी आहे.

दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. फेब्रुवारी महिन्यात सुद्धा अहमदनगर मंडळात ५ हजार ४८४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती.ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग ,वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

मागील महिन्याप्रमाणे फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुद्धा सदर मोहीम राबविली जात आहे. यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार साधारणतः पुढील २४ तास अवधीपर्यंत त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.