महावितरणच्या अभियंत्यास मागितली दोन लाखाची खंडणी

हॉटेल लिलियम पार्कच्या मालकासह दोघांवर गुन्हा
महावितरणच्या अभियंत्यास मागितली दोन लाखाची खंडणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लाचलुचपतच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी महावितरणच्या नगर ग्रामीण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता किसन भिमराव कोपनर (वय 42 रा. शिलाविहार, सावेडी) यांना दोघांनी दोन लाख रुपये खंडणी मागितली. जानेवारी 2022 मध्ये ही घटना घडली असून यासंदर्भात 13 डिसेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांढरीपूल येथील हॉटेल लिलियम पार्कचे मालक सुरेश विठ्ठलराव शेटे (रा. अर्बन बँक कॉलनी, सावेडी) व नवनाथ हरिश्चंद्र ईसारवडे (रा. गदेवाडी ता. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जुलै 2018 मध्ये महावितरणच्या नगर ग्रामीण उपविभागीय कार्यालयाने सुरेश शेटे याच्या हॉटेल लिलियम पार्कवर वीज चोरी केल्याबद्दल कारवाई केली होती. त्यानंतर 17 फेब्रुवारी, 2021 रोजी सुरेश शेटे याच्या मालकीच्या लिलियम पार्क हॉटेल याठिकाणी भरारी पथकाने कारवाई केेली होती.

वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे कारवाई दरम्यान लक्षात आल्याने त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने शेटे याला सहा लाख 90 हजार रुपये निर्धारक देयक दिले होते. परंतु दंडाची रक्कम न भरता शेटे याने 3 जानेवारी, 2022 रोजी हस्तकामार्फत खोसपुरी (ता. नगर) येथील वरीष्ठ तंत्रज्ञ टिमकरे व भिसे यांच्याविरूध्द लाचलचुपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर 4 जानेवारी, 2022 रोजी सायंकाळी फिर्यादी त्यांच्या घरी असताना नवनाथ ईसरवाडे याने फोनव्दारे तसेच व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून दोन लाख रूपये खंडणी मागितली.

दरम्यान फिर्यादी कोपनर यांनी खंडणीची पुर्तता न केल्यामुळे 22 जानेवारी, 2022 रोजी त्यांच्याविरूध्द ज्ञानेश्वर ग्यानोजी सोनवणे (रा. दरेवाडी ता. नगर) यांचे मार्फत अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ अधिकारी असून माझी जनमानसात प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करून खंडणी मागितल्याने शेटे व ईसरवाडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com