
देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara
महावितरणने शेतकर्यांच्या शेतीच्या वीजबिलाची वसुली सुरू केली आहे. शेतकर्यांची वीजतोडणी करू नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही थेट वीजतोडणी न करता परिसरातील रोहीत्र बंद ठेवून शेतकर्यांना वीजबिलासाठी वेठीस धरण्याचा प्रकार सुरू झाला आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच महावितरणने हे पाऊल उचलल्याने शेतकर्यांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.
दरम्यान मागील वर्षी देखील अशाच प्रकारे शेतीचे वीजबिल वसुलीसाठी महावितरणने पाऊल उचलले होते. त्यावेळी असणारे राज्याचे विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेश सरकारने शेतकर्यांची सहा हजार कोटींचे वीजबिल माफ केल्याबद्दल त्या सरकारचे कौतुक केले होते व मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील शेतकर्यांना वीजबिल माफी देण्याची मागणी केली होती. आता तर फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना या सर्व गोष्टींचा विसर पडलेला दिसत आहे. असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
यंदा अतिवृष्टीने रब्बी हंगामाला उशीर झाला आहे. खरिपातील होत नव्हतं ते सर्व निसर्गाने हिरावून नेलं. तरी देखील खचून न जाता बळीराजा रब्बीच्या तयारीला लागला असतानाच महावितरणने पठाणी वसुली सुरू करुन वीजबिल भरण्याचा तगादा सुरू करून रोज दहा रोहित्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. वास्तविक पाहता खरिपात झालेल्या पिकांच्या नुकसानीची दमडीदेखील शासनाने दिली नाही. अशी वाईट स्थिती असतानादेखील उधार उसनवारी करत बळीराजा रब्बीच्या तयारीला लागला आहे. कांद्याची रोपे टाकली आहेत. गव्हाची पेरणी व काही ठिकाणी कांदा लागवड सुरू आहे. या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना ऐन वेळेला महावितरणने रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावल्याने शेतकर्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.
कुठल्याही प्रकारची शासकिय मदत नाही. खिशात एक छदाम नाही. होतं नव्हतं ते किडुकमिडूक मोडून बी-बियाणं आणलं, ते पेरलं पण त्याला पाणी नाही मिळालं तर बियाणे वायाला जाणार. आता करायचं काय? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. या प्रश्नावर सत्ताधारी व विरोधक दोन्हीही गप्प असल्याने शेतकरी वर्गात तिव्र संताप व्यक्त होत आहे. या रोहित्र बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी व महावितरण यांच्यातील संघर्ष अटळ दिसत आहे. हा संघर्ष होऊ नये, असे वाटत असेल तर बंद केलेले रोहीत्र त्वरीत सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
शेतीला दररोज फक्त आठच तास एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्री असा वीजपुरवठा करण्यात येतो. त्यात पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण जास्त आहे. वीजबिल आकारणी हॉर्सपावर पद्धतीने होते. आठ तास वीजपुरवठा असला तरी आठवड्यातून एक दिवस पुरवठा बंद असतो. त्यात पावसाळ्यात चार महिने मोटारी बंदच असतात. मग महावितरण वसुली कशाची करते? असा सवाल शेतकर्यांनी केला आहे.