महावितरणच्या श्रीरामपूर कार्यालयाच्या विभाजनाबाबत कार्यवाही करण्याची आ. कानडे यांची सूचना

महावितरणच्या श्रीरामपूर कार्यालयाच्या विभाजनाबाबत कार्यवाही करण्याची आ. कानडे यांची सूचना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील वाढते वीज ग्राहक लक्षात घेता श्रीरामपूर विभागीय कार्यालयाचे विभाजन करून श्रीरामपूर शहर व ग्रामीण असे दोन उपविभाग करणेबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना आ. लहू कानडे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना केली.

श्रीरामपूर येथील एमआयडीसीमध्ये आ. कानडे यांच्या प्रयत्नाने 200 के. व्ही. उच्चदाब वीज उपकेंद्र मागील वर्षी मंजूर झाले आहे. तथापि महापारेषण कंपनीने सदरच्या कामाच्या बांधकामाची सुरुवात केली नाही. सदरचे काम सन 2022-23 या आर्थिक वर्षात हाती घेण्याबाबत काय अडचणी आहेत किंवा त्याबाबत काय पाठपुरावा करावा लागेल, तसेच उक्कलगाव सब स्टेशनचे काम तातडीने मार्गी लावण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी आ. कानडे यांनी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. भंगाळे व अधीक्षक अभियंता श्री. काकडे यांची भेट घेतली.

श्रीरामपूर तालुक्यात एकूण 66 हजार वीज ग्राहक आहेत. त्यामुळे श्रीरामपूर विभागीय कार्यालयाचे विभाजन करून श्रीरामपूर शहर व ग्रामीण असे दोन उपविभाग करणेबाबत आ.कानडे यांनी कळविले होते. याबाबतचे निर्मिती प्रस्तावावर लवकरात लवकर मार्गदर्शक सूचना प्रस्तुत करून पुढील कार्यवाही करण्याचे आ.कानडे यांनी अधीक्षक अभियंता श्री. काकडे यांनी सांगितले. तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विजेच्या विविध प्रश्नांबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केलेल्या मागण्यांबाबत अधिक्षक अभियंता स्तरावरून काय पाठपुरावा झाला आहे, याबाबतही माहिती घेतली. सदरची कामांसह श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील दुरुस्तीची व नवीन सबस्टेशनची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तेथील यंत्रणेला अंग झटकून काम करण्याबाबत जिल्हास्तरावरून मार्गदर्शन करण्याची सूचनाही आ. कानडे यांनी केली.

Related Stories

No stories found.