महावितरणच्या नावे ग्राहकांना फसवे संदेश

जिल्हाभरातून तक्रारी : फसव्या संदेशपासून सावध राहण्याचे महावितरणचे आव्हान
महावितरणच्या नावे ग्राहकांना फसवे संदेश

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

महावितरणच्या नावे ‘वीज बिल भरा अन्यथा आजच रात्री कनेक्शन तोडण्यात येईल,’ असा संदेश देऊन ग्राहकांना लुटण्याचा नवा प्रकार सायबर चोरांनी वापरायला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातून अशा तक्रारी समोर आल्या आहेत. अद्यापपर्यंत कोणाची फसवणूक झाली नसली तरी ग्राहकांनी अशा संदेशापासून सावध राहण्याचे आव्हान महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान याप्रकरणी स्थानिक पातळीवर ग्राहकांकडून संदेश प्राप्त होत असल्याबाबतच्या तक्रारी तोंडी स्वरूपात आल्या असून ग्राहकांना अशा संदेशापासून सावध राहण्याचे सांगितले जात असल्याचे महावितरणच्या अहमदनगर कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करणार आहे. त्यासाठी सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट संदेश नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. मात्र, कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे संदेश व व्हॉट्सअप संदेश पाठविण्यात येत नाहीत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

वीज ग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट संदेश पाठवून संपर्क साधण्यास सांगितले जाते. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगणे व त्याला वीज ग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार राज्यभरात समोर आले आहे. महावितरण कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून बिल भरण्यासाठी अथवा भरलेले बिल अपडेट करण्यासाठी संदेश पाठविले जातात. आलेल्या संदेशातील मोबाइल क्रमांकावर संपर्क केल्यानंतर फसवणूक केली जाते. ग्राहकाने डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून तो प्रतिनिधी ग्राहकाच्या मोबाइलचा ताबा घेऊन त्याद्वारे बँक खाते, डेबिट कार्डचा तपशील घेऊन परस्पर खात्यातील पैसे वळून घेत असल्याचे प्रकार घडत आहे.

वीज भरणा करण्यासंदर्भात बनावट संदेश प्राप्त होत असल्याच्या तक्रारी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत ग्राहकांना कळविण्यात आले आहे की, असे कोणतेही संदेश महावितरणकडून पाठविले जात नाही, बनावट संदेशापासून सावध राहावे. बनावट संदेश येत असल्याबाबतच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातून कोणाची फसवणूक झाली असल्याची तक्रार अद्यापपर्यंत जिल्ह्यातून आलेली नाही.

- सुनील काकडे (अधीक्षक अभियंता, महावितरण)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com