महावितरण विरोधात प्रवरासंगम येथे शेतकर्‍यांचा रास्तारोको

गोदाकाठच्या शेतकर्‍यांची विज तोडल्याने संताप आश्वासनानंतर आंदोलन मागे
महावितरण विरोधात प्रवरासंगम येथे शेतकर्‍यांचा रास्तारोको

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

नेवासा तालुक्यातील गळनिंब, खेडले काजळी, प्रवरासंगम, गोगलगाव, सुरेगाव, मंगळापूर, आदी गोदाकाठच्या गावातील शेतकरी व प्रहार संघटना, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना यांच्यावतीने शनिवार दि. 11 रोजी महावितरण कंपनीच्या कारभाराच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टोका-प्रवरासंगम येथे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

तालुक्यातील गोदाकाठच्या गळनिंब, गोगलगाव, खेडले काजळी, मंगळापूर, सुरेगाव या गावांतील कृषिपंपांचा वीजपुरवठा काही महावितरणने काही दिवसापासून खंडित केला. पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. याबाबत शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणे मांडले होते. तरीदेखील परिस्थितीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी प्रवरासंगम येथे रास्ता रोको आंदोलन केले असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके यांनी सांगितले

बिले नव्याने दुरुस्त करून द्यावीत, खराब झालेले रोहित्र त्वरीत दुरूस्त करून मिळावी, वीजपुरवठा पूर्ण दाबाने करावा, आदी मागण्या शेतकर्‍यांच्या आहेत. करोना काळातील आलेली वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य जनतेला वीज बिले भरता आलेली नाही. त्यामुळे वीज वितरणची थकबाकी वाढल्याने त्यांनी मार्चअखेर डोळ्यासमोर ठेऊन वीज वितरणने वीज बिलांची वसुली सुरू केली आहे. ही वीज बिले माफ करावी, वसुली थंबवावी अशा मागण्यांच्या घोषणा शेतकर्‍यांकडून देण्यात आल्या. ‘जय जवान जय किसान’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

प्रहार संघटनेचे अभिजित पोटे, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना सुकाणू समिती प्रदेश अध्यक्ष अंबादास कोरडे, अनिल मते, कल्याण मते, प्रहारचे अनिल विधाटे, अ‍ॅड. पांडुरंग औताडे, आदिनाथ नवले आदींनी मनोगत व्यक्त करत वीज वितरण कंपनीच्या कारभाराचे वाभाडे काढले.

आंदोलकांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी विनंती धुडकावून लावत मागण्या मान्य करण्याचा आग्रह कायम ठेवला. नंतर नेवासा वीज वितरणचे उपअभियंता शरद चेचर, उपअभियंता श्री. काळे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वीजवितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

या प्रसंगी हरिभाऊ शेळके, वसंतराव डावखर, बाळासाहेब खरजुले, संदीप सुडके, दौलतराव गणगे, योगेश म्हस्के, रायभान कोरडे, बाळासाहेब कोरडे, दत्तात्रय मते, निलेश शेळके, किशोर शेळके, धनंजय लोखंडे आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांनी रस्ता रोको आंदोलन करत असताना सेना दलाच्या वाहनांना जाण्यासाठी रस्ता काहीवेळ मोकळा करून देण्यात आला या आंदोलनामुळे अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली. नेवाशाचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव ङोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत आंदोलन पार पडल्याने पोलीस प्रशासनाने मोकळा श्वास घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com