अहमदनगर (प्रतिनिधी) -

शहराच्या मध्यभागी असलेल्या तेलीखुंट पावर हाऊसमध्ये भाईगिरी करत अधिकार्यांसह कर्मचार्यांना शिवीगाळ करत मारहाण

करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणला या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील बाळकृष्ण धंगेकर असे मारहाण करणार्या आरोपीचे नाव आहे. अमोल भानुदास शेळके यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. काल शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पावर हाऊसमध्ये ही घटना घडली. अमोल शेळके हे वायरमन असून बापू बडेकर हे कंत्राटी कर्मचारी आहेत. रात्री हे दोघे पावर हाऊसमध्ये असताना निखील धंगेकर काही कारण नसताना कार्यालयात आला. कार्यालयाच्या दरवाजावर तो लघुशंका करू लागला. त्याला शेळके यांनी समजावले.

समजावून सांगितल्याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करत त्यांनाच मारहाण केली. काही वेळाने तो हातात चाकू घेऊन आला. चाकू मारण्यासाठी त्याने शेळके यांच्याकडे धाव घेतली असता बडेकर यांनी त्याला ढकलून दिले. ही बाब बडेकर यांनी सहाय्यक अभियंता पालवे यांना कळविली. पालवे यांनी पावर हाऊसमध्ये धाव घेतली. त्यांनी धंगेकर यास समजावून सांगितले, पण त्यांनाही धंगेकर याने शिवीगाळ करत मारहाण केली.

धंगेकर खुर्चीत, वायरमन जमिनीवर

पालवे जेव्हा पावर हाऊसच्या ऑफिसमध्ये पोहचले तेव्हा धंगेकर हा खुर्चीत बसलेला होता. वायरमन शेळके आणि बडेकर हे त्याच्यासमोर जमिनीवर बसलेले होते. तू कोण, कशाला येथे आला, अशा अरेरावीच्या भाषेत धंगेकर याने सहाय्यक अभियंता पालवे यांनाच प्रश्न विचारला. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाणही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.