अहमदनगर (प्रतिनिधी) -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा रविवार (दि.21) जिल्ह्यातील 51 उपकेंद्रांवर

घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 15 हजार 847 विद्यार्थी असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 1 हजार 638 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, करोनाची लक्षणे आणि करोना अहवाल बाधित असणार्या परीक्षार्थींना परीक्षेसाठी पीपीई किट देण्यात येणार आहे. या परीक्षेचे नियंत्रण आणि केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे काम पाहणार आहेत.

रविवारी परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी 8-30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांनी आयोगाने दिलेले विहित ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच ओळखीच्या पुराव्यासाठी आयोगाने विहित केलेल्या ओळखपत्रांपैकी स्वत:चे छायाचित्र आणि इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल असे कोणतेही मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत (सत्रनिहाय स्वतंत्र प्रत) सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांना एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य इत्यादी वापरण्यास, परीक्षेच्या दोन सत्राच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्राबाहेर जाण्यास व परीक्षा कक्षात/ परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन इत्यादी सारखी दूरसंचार साधने आणण्यास आणि स्वत:जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणार्या उमेदवारांना या परीक्षेस तसेच त्यापुढील आयोगाच्या इतर सर्व परीक्षांसाठी कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी कळविले आहे.

परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी तसेच परीक्षेसाठी प्रविष्ट होणार्या उमेदवारांनी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांचे पालन करणे तसेच मास्क, हातमोजे, सॅनिटायझर जवळ बाळगणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बूथ, फॅक्स, झेरॉक्स, दुकाने बंद ठेवण्याकामी परीक्षेच्या दिवशी सकाळी 10 वाजलेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 (3) लागू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने खालील अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये समन्वय अधिकारी 13 (उपजिल्हाधिकारी संवर्ग), भरारी पथक 2 (उपजिल्हाधिकारी संवर्ग), उपकेंद्र प्रमुख 51 (वर्ग 1चे अधिकारी), सहायक 51, पर्यवेक्षक 166, सहायक कर्मचारी 97, समन्वय अधिकारी/भरारी पथक सहायक 15, समवेक्षक 661, लिपीक 51, केअर टेकर (शाळेचे) 51, बेलमन 45, शिपाई 202, पाणीवाटप कर्मचारी 166 आणि वाहनचालक 67 यांचा समावेश आहे.