कोणत्याही कारवाईला घाबरत नाही- खा. विखे

कोणत्याही कारवाईला घाबरत नाही- खा. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आपण जी रेमडेसिवीर इंजेक्शन आणली, त्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. इंजेक्शनमुळे ज्यांचे जीव वाचले, ते लोक माझ्या पाठिशी आहेत. आता ती इंजेक्शन संपली आहेत, त्यामुळे कारवाई आणि जप्त काय करणार? माझा तो व्हिडिओ नीट पाहिला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सांगून नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राजकीय आणि कायदेशीर वादाला उत्तर दिले.

खासदार सुजय विखे यांनी दिल्ली येथून विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला होता. त्यावरून राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू असतानाच यासंबंधी आता उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आढावा बैठकीसाठी आले असता डॉ. विखे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

सुजय विखे म्हणाले, गरजू रुग्णांना मदत करण्यात काही गैर नाही. यात आम्हाला कोणते राजकारण करायचे नाही किंवा व्यवसाय करायचा नाही. अडचणीच्या काळात विखे कुटुंबांची लोकांसोबत राहण्याची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही कितीही पक्ष बदलले तरी लोक पन्नास वर्षांपासून आमच्यासोबत आहेत. आम्ही काही चुकीचे करणार नाही, यावर लोकांचा विश्वास आहे.

यावेळीही आम्ही काही चुकीचे केले नाही. त्या इंजेक्शनची खरेदी आणि वाटपाची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. आणलेला साठा संपल्याचे आपण त्या व्हिडिओमध्येच जाहीर केले आहे. त्यामुळे आता कारवाई काय करणार आणि जप्त काय करणार? इंजेक्शनचे रिकामे बॉक्स आता शिल्लक आहेत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला आणि राजकारणाला आम्ही घाबरत नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com