अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली पाहिजे, या मताचा मी आहे. यंदाही आपण चांगल्या पद्धतीने निवडणूक करून दाखवू.

सहकारातील समविचारी लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढवली जाईल, अशी भूमिका भाजप खा. डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी स्पष्ट केली. साखर कारखानदारांची म्हणून यापूर्वी जिल्हा बँकेची ओळख होती, परंतु माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी समतोल साधत बँक शेतकर्यांसाठी आहे हे दाखवून दिले, अशा शब्दात खा. विखे यांनी कर्डिले यांचे कौतुक केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे, माजी मंत्री कर्डिले, असे भाजपची नेते मिळून आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, असेही खा. विखे यांनी स्पष्ट केले.

सहकारातील गट व साखर कारखानदार यांना बरोबर घेऊन निवडणुकीला जाईल. यापूर्वीही आपण तसा प्रयत्न केला होता. समविचारी जेवढे बरोबर येतील तेवढ्यांना समवेत घेऊन निवडणूक केली होती. यंदाही तसा प्रयत्न करु. जेवढे येथील तेवढे बरोबर घेऊ, असे विखे म्हणाले.

जिल्हा बँक शेतकर्यांची की साखर कारखानदारांची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याकडे लक्ष वेधले असता विखे म्हणाले, साखर कारखान्यांच्या व्याजावरच बँकेला प्रचंड फायदा होतो. त्यामुळे सहाजिकच बँकेवर कारखानदारांचे वर्चस्व राहिले. परंतु यंदा कर्डिले व इतर संचालकांनी बँकेच्या या भूमिकेत बदल केला.

जनावरांसाठी खेळते भांडवल, चारा, खावटी कर्ज या माध्यमातून सुमारे 350 कोटीहून अधिक कर्ज वाटप शेतकर्यांना केले. शेतकरी आणि कारखानदार असा समतोल आता साधला जात आहे, त्यामध्ये कर्डिले यांचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गारही विखे यांनी व्यक्त केले.