अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोव्हिड संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीनंतर सादर झालेला अर्थसंकल्प लघुउद्योगांना नव्या संधी देणारा आहे.

या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन् यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. डॉ विखे पाटील म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल राखणारा हा अर्थसंकल्प आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून शहरातही पाणी योजना सक्षम होऊ शकतील.

ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सुविधांवर अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात केलेल्या आर्थिक तरतुदीमुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळेल. कोव्हिड लससाठी 35 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीचे त्यांनी स्वागत केले. कृषी क्षेत्राला या अर्थसंकल्पाने नवी दिशा दिली आहे.

बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहणार असल्याचा विश्वास अर्थसंकल्पाने दिला असल्याचे स्पष्ट करून बाजार समित्यांचा पाया भक्कम करून शेतकर्यांच्या उत्पादीत मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी एक हजार बाजार समित्या ऑनलाईन पध्दतीने जोडून व्यवसायाच्या संधी दिल्याचे खा. डॉ. विखे यांनी सांगितले.

करोनाच्या पाश्वर्भूमीवर केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी सादर केलेले बजेट हे देशाला पुढे नेऊन आत्मनिर्भर करणारे व सर्व क्षेत्रांना दिलासा देणारे आहे. बँकिंग, इंड्रस्ट्रीज, उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांसठी हे बजेट मोठे दिलासादायक आहे. विशेष करून शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार असल्याने मोठा फायदा शेतकर्यांना होणार आहे.
- माजी खासदार दिलीप गांधी.

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. या काळात आम्ही निर्गुंतवणुकीच्या धोरणावर काम केल्याचे सांगत त्यांनी आणखी दोन कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. यावरून हेच सिद्ध होते की सरकारकडे सरकारी मालमत्ता विकून पैसे उभे करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारे अर्थात आडात नाही त्यामुळे पोहर्यात काय येणार असे बजेट.
- आमदार संग्राम जगताप.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत बनवण्यासाठी व करोना महामारीतून अर्थव्यवस्था सावरणार असा, तसेच सर्व स्तरातील नागरिक, गरिबातील गरीब माणसाचा विचार असणारा, उद्योग, बँका, रस्ते, रेल्वे, शेती, पर्यावरण, आरोग्य यावर भर असणारा हा दूरदृष्टीने तयार केलेला अर्थसंकल्प आहे. अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थराज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांचे अभिनंदन.
-प्रा. भानुदास बेरड, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य.