उंबरे /राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Umbare

राहुरी कारखाना बंद पाडून खाजगीकरण करण्याचा विरोधकांचा डाव असून त्यासाठी येत्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये

विरोधक निवडणूक लढवणार आहेतच. मात्र जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांचा हा डाव मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे अभिवचन कारखान्याचे मार्गदर्शक खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी डॉ. तनपुरे कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना दिले आहे.

डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे हे होते. यावेळी माजी चेअरमन व विद्यमान संचालक उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस, विद्यमान संचालक शामराव निमस, संचालक बाळकृष्ण कोळसे, केशवराव कोळसे, महेश पाटील, मच्छिंद्र तांबे, अशोक खुरुद, मधुकर पवार, उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, भारत तारडे, शिवाजी सयाजी गाडे, सुरसिंगराव पवार, विजयराव डौले, नंदकुमार डोळस, अर्जुनराव बाचकर, सुभाष वराळे, श्रीमती हिराबाई चौधरी, सौ पार्वतीबाई गोरक्षनाथ तारडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. एन. सरोदे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अंबादास पारखे आदी उपस्थित होते.

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मागील 3 वर्षात 25 सहकारी साखर कारखाने बंद पाडून खासगीकरण करून ताब्यात घेतले. तनपुरे कारखान्याचे एप्रिल अखेरपर्यंत ऊस गाळप सुरू राहणार ज्यांचे राहूरी कारखान्याला उसाच टिपरु जात नाही, त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार नाही. यंदाच्या गाळपास अनेक अडचणी आल्या. परंतु सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचार्यांनी अपार मेहनत घेतल्यामुळे 2 लाख टन ऊस गाळप आजअखेर पूर्ण झाले. नर्सिंग होम, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये मी कधी पाय ठेवला नाही, माझं एकच ध्येय सभासद, कामगारांचा आत्मा असलेला राहूरी कारखाना सुरळीत चालवून सर्वांना न्याय मिळावा, हीच आमची पहिल्यापासूनच भूमिका आहे.

ऑनलाइन मीटिंगमध्ये सभासदांनी प्रश्न विचारले. त्याला खा. सुजय विखे यांनी त्यांना उत्तरे दिली. ऑनलाइन मीटिंगमध्ये तनपुरे कारखाना संचालक मंडळ व सुजय विखे यांच्यावर टीका करणारे अमृत धुमाळही हजर होते. कोण आहेत ते, चष्मावाले कोण आहेत, मी त्यांना ओळखत नाही, बोलायच का तुम्हाला अशी विचारणा खा. विखे यांनी केली. बर्याच वेळ वाटही पाहिली परंतु अमृत धुमाळ एक शब्दही बोलले नाही. त्यानंतर सुजय विखे यांचे भाषण सुरू झाले. मात्र ऑनलाईन स्क्रीनवर अमृत धुमाळ परत दिसूनही आले नाही. तर कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब देशमुख यांनी अमृत धुमाळ यांनी आमच्या खोट्या सह्या करून कारखान्याच्या विरोधात अर्ज दिल्याचे स्पष्टीकरण केले.

यावेळी चेअरमन नामदेवराव ढोकणे यांनी सांगितले की, कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी खा. सुजय विखे यांनी मोठे प्रयत्न केले. त्याचबरोबर कारखान्याच्या सभासदांनी कारखान्याला ऊस देऊन केलेल्या सहकार्याबद्दल सभासदांचे तसेच कारखान्याच्या कामगारांनीही मोठे कष्ट घेऊन कारखाना व्यवस्थित सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी कारखान्याचे सभासद वसंतराव कोळसे, अनिल शिरसाठ, अण्णासाहेब बाचकर आदींसह सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. राहुरीचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, राहुरी बाजार समितीचे संचालक सुरेश बानकर, राहुरी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, अनिल आढाव, दत्तात्रय खुळे, प्रफुल्ल शेळके, ज्ञानदेव देठे हे सभेच्या ठिकाणी प्रत्यक्षात तर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुरेश वाबळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश करपे आदि सह अनेक सभासदांनी या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभाग घेतला. कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक उदयसिंह पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संचालक महेश पाटील यांनी आभार मानले.

25 कोटी विसरू नये

प्रवेरेचे 25 कोटीं रुपये राहुरी कारखान्याकडे आहेत. ते कारखाना सुस्थितीत यावा म्हणून आम्ही खर्च केले आहेत, हे कोणी विसरू नये. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी कारखान्यासाठी मोठी मदत केली असल्याचाही उल्लेख खा. विखे यांनी केला. दुसर्याकडून सुपारी घेऊन घरं चालवणार्यांनी आपल्याकडील थकबाकी अगोदर भरावी, मग प्रश्न करा, आम्ही उत्तरे देऊ, असे खा.डॉ.विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.