कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायत हद्दीतील नागरिकांचा अपघात विमा डॉ. सुजय विखे पाटील हे स्वतः उतवणार आहेत.

याची घोषणा त्यांनी स्वतः कर्जत येथील नगरपंचायत मधील कार्यक्रमामध्ये केली.

कर्जत नगर पंचायतच्यावतीने शहरामध्ये समर्थ गार्डन व शहा गार्डन या दोन गार्डनचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात माजी मंत्री राम शिंदे व खा. डॉ. विखे पाटील यांच्याहस्ते नुकताच पार पाडला. यावेळी हभप माऊली महाराज पठाडे, नामदेव राऊत, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, अशोक खेडकर, मुख्याधिकारी गोविंद जाधव, प्रांताधिकारी अर्चना नसते, तहसीलदार नानासाहेब आगळे, भामाबाई राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, स्वप्नील देसाई, अल्लाउद्दीन काझी, उमेश जेवरे, उषा मेहेत्रे, काकासाहेब धांडे, सचिन पोटरे, संजय भैलुमे, सतीश पवार, नीता कचरे, अमृत काळदाते, अनिल गदादे, वृषाली पाटील, सुनील यादव, वैभव शहा आदी उपस्थित होते.

या लोकार्पण कार्यक्रमांमध्ये वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये खा.डॉ. विखे पाटील यांचा वाढदिवस नगर पंचायतीच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी खा. डॉ. विखे पाटील यांची कर्जत नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांना वाढदिवसाची अनोखी भेट जाहीर केली.

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघात विमा योजना कर्जत नगरपंचायत मधील सर्व नागरिकांना मी स्वतः खर्च करून राबविणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये डॉ. विखे यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती जमा करून त्यांचा विमा उतरवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला दोन लाख रुपयांचे विमा कवच मिळणार असल्याचे खा. डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. खा. विखे यांच्या या घोषणेचे कर्जत शहरात जोरदार स्वागत करण्यात आले असून कार्यक्रमानंतर शहरामध्ये याची मोठी चर्चा होती.

यावेळी खा. विखे पाटील यांनी नगरपंचायतच्या कारभाराचे कौतुक करताना शहरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवला, शहरात चांगले रस्ते केले, लाईटची चांगली व्यवस्था केली, फिल्टर युक्त पाणी, नागरिकांच्या सोयीसाठी गार्डन हाच खरा विकास आहे आणि याच विकासामुळे नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांचे मनोगत झाले.