अधिकार्‍यांंनी राजीनामे देऊन निवडणुका लढवाव्यात
सार्वमत

अधिकार्‍यांंनी राजीनामे देऊन निवडणुका लढवाव्यात

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची प्रशासनावर टीका; पंतप्रधानांकडे कैफियत मांडणार

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लोकप्रतिनिधी हे जनतेने निवडून दिलेले असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींची भूमिका ही लोकांच्या हितासाठीच असते नव्हे तर तो लोकांचाच आवाज असतो, असे असताना जर अधिकारी स्वतःच सर्व निर्णय घेणार असतील तर भविष्यात कोणीही लोकप्रतिनिधी होणार नाही. अधिकार्‍यांनाच जर सर्व करायचे असेल तर त्यांनी राजीनामे देऊन निवडणुका लढवाव्यात, अशी परखड टीका प्रशासनावर करत खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेळ मागितली असून लवकरच त्यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याकडे कैफियत मांडणार असल्याचे सांगितले.

मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले, मी गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकार्‍यांशी बोलतोय ते माझे ऐकून घेतात. मात्र ऐकत नाही. मी विरोधी खासदार असलो तरी सध्या करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. रॅपिड टेस्ट या विश्वासार्ह नाहीत. त्याची टक्केवारी फार कमी आहे.

त्यामुळे स्वॅब टेस्ट घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत आपण अनेक सूचना केल्या. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. जे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहेत, परंतु त्यांना कुठलाही त्रास नाही, अशा रुग्णांना होम क्वॉरंटाईन करण्यास परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचे पत्र आजच आपण जिल्हाधिकार्‍यांना पाठविले आहे.

खासगी रुग्णालये, खासगी डॉक्टर ताब्यात देण्यास तयार आहेत, परंतु केंद्र सरकारकडून 20 कोटी रुपये येवूनही आणि त्यापैकी 4 कोटी रुपये नर्सिंग व इतर स्टाफसाठी असताना नर्सिंग स्टाफ उपलब्ध होत नाही, ही समस्या आहे. याबाबतही आपण अधिकार्‍यांशी बोललो.

मात्र निर्णय काही होत नाही. त्यामुळे करोनासारख्या महाभयंकर साथीच्या काळात अधिकारी स्वतःच सर्व निर्णय घेत असतील, लोकप्रतिनिधींचे ऐकत नसतील तर भविष्यात लोकप्रतिनिधी होण्यास कोणाला रस राहणार नाही. ही सर्व परिस्थिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडणार आहोत. त्यासाठी आपण त्यांच्याकडे वेळही मागितली असल्याचे खा.डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.

‘मुळा-प्रवरा’च्या सभासदांची 500 रुपयात करोना चाचणी

मुळा-प्रवरा वीज संस्थेने आज संचालक मंडळात सभासदांना सवलतीच्या दरात करोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या सभासदांचे वय 50 वर्षाच्या पुढे आहे, अशा सभासदांची करोना टेस्ट अवघ्या 500 रुपयात करण्यात येणार आहे. इतरत्र ही टेस्ट 2200 रुपयांना आहे. जर एखाद्या सभासदाची करोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली तर त्यांच्या कुटुंबियांची टेस्ट करायची असल्यास त्यांना 40 टक्क्यापर्यंत सवलत कशी मिळेल, याबाबत आपण संबंधीत कंपनीशी बोलणार आहोत. श्रीरामपूर, बाभळेश्वर आणि राहुरी या तीन ठिकाणी असणार्‍या मुळा-प्रवराच्या कार्यालयात पुढच्या सोमवारपासून या करोना टेस्ट सभासदांसाठी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com