रेमडेसिवीरच्या 'हवाई प्रवासा'बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे कानावर हात
औरंगाबाद |प्रतिनिधी| Aurangabad
नगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या गाजत आलेल्या ‘हवाई रेमडेसिवीर’च्या प्रवासात आता चंदीगडचे नाव समोर आले. 1200 इंजेक्शनचा साठा चंदीगड येथून आणण्यात आला, असा दावा करण्यात आला आहे. तर केवळ 1700 इंजेक्शन खरेदीची मंजूरी दिल्याचे नगर जिल्हा प्रशासनाने खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार, आ.रोहित पवार, माजी आ.शिरीष चौधरी, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.अमरीश पटेल यांच्यावरही विनापरवाना रेमडेसिवीर वाटप केल्याप्रकरणी कार्यवाही करावी, असा दुरूस्ती अर्ज याचिकाकर्त्यांनी दाखल केला. याप्रकरणी पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे.
खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी विशेष विमानातून रेमडेसिवीर इंजेक्शन आणून जिल्ह्यात वाटप केल्याचा दावा केला होता. त्यावर परवानगी नसताना त्यांनी हजारो रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मिळालाच कसा, असा आक्षेप घेण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आहे. न्या.आर.व्ही.घुगे व न्या.बी.यु.देबडवार यांच्या बेंचसमोर सोमवारी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांचा दुरूस्ती अर्ज आणि नगर जिल्हाधिकार्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्यावतीने रेमडेसिवीर इंजेक्शन साठ्याच्या खोक्यांची माहिती न्यायालयास सादर करण्यात आली.
याप्रकरणात न्यायालयाने आपलीही बाजू ऐकावी, असा अर्ज खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला. 1700 रेमडेसिवीरचा साठा नियमाप्रमाणे खरेदी केला. त्यातील 1200 इंजेक्शनचा साठा चंदीगड येथून शिर्डी येथे खाजगी विमानाने आणला, असेही त्यांनी अर्जात म्हटले आहे. अहमदनगर जिल्हाधिकार्यांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा चंदीगड येथून शिर्डी येथे खाजगी विमानाने आणला जाणार, याबाबत आपल्याला काहीही कल्पना नव्हती. खा.डॉ.विखे व त्यांच्या विखे हॉस्पिटलला 1700 इंजेक्शनचा साठा खरेदी करण्यासाठी परवानगी दिली होती. त्याची नोंद अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आहे, असे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे.
याचिकाकर्त्यांनी एका वृत्तपत्रात आलेले बातमीच्या आधारे अन्य राजकीय नेत्यांविरोधातही परवानगी नसताना रेमडेसिवीर वितरण केल्याबाबत कार्यवाहीची विनंती न्यायालयाला केली. या नेत्यांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार व आ.रोहित पवार, आ.अमरीश पटेल, आ.शिरीष चौधरी, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे.
याचिकार्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना, खा.डॉ.विखे यांच्याकडे 1700 इंजेक्शन व्यतिरिक्त अधिक साठा आहे, असा आक्षेप घेण्यात आला. हा साठा उघड होवू नये यासाठी शासकीय अधिकारी खोटे कागदपत्रे तयार करत आहेत. खाजगी विमानाने आणलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा एकाच कंपनीचा असल्याचे भासवले जात आहे, मात्र त्यांच्याकडून 3 वेगळ्या कंपनीची इंजेक्शन वितरित करण्यात येत आहे, असे मत याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आले.
याचिकाकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांच्यावतीने अॅड.प्रज्ञा तळेकर, अॅड.अजिंक्य काळे, अॅड.उमाकांत आवटे व अॅड.राजेश मेवारा तर शासनाच्यावतीने अॅड.डी.आर.काळे काम पाहत आहेत.