शिर्डीतील कोविड सेंटरमध्ये अन्य तालुक्यातील रूग्ण आणल्यास तिव्र विरोध करू - खा. डॉ. सुजय विखे

शिर्डीतील कोविड सेंटरमध्ये अन्य तालुक्यातील रूग्ण आणल्यास तिव्र विरोध करू - खा. डॉ. सुजय विखे
खा. सुजय विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

शिर्डीतील कोविड सेंटरमध्ये अन्य तालुक्यातील रूग्ण आणण्यास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज तिव्र विरोध दर्शवला.

पहिले प्राधान्य तालुक्यातील रूग्णांना. मंत्र्यांनी व आमदारांनी आपल्या तालुक्यातील जनतेसाठी आपल्या तालुक्यातच कोविड सेंटर उभारावे, असे खडे बोल खा. डॉ.सुजय विखे यांनी सुनावले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डीत बैठक घेवून साईसंस्थानने शेजारच्या तालुक्यातील रूग्णांवर येथे उपचार करण्याच्या सुचना केल्या होत्या. थोरातांच्या या सुचनेला खा. विखे यांनी आज तीव्र आक्षेप घेतला. खासदार डॉ. विखे यांनी आज अधिकारी व मोजक्या कार्यकर्त्यांसह कोवीड सेंटरमध्ये येवून करोनाचे नियम पाळत गुढी उभारून करोना रूग्ण व डॉक्टरांसोबत पाडवा साजरा केला.

यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले की, येथील कोविड सेंटर हाऊसफूल आहे. तालुक्यातील डॉक्टर्स, अधिकारी, ग्रामस्थांनी संस्थानच्या मदतीने शिर्डीत कोविड सेंटर उभारले आहे. त्यामुळे येथील सेंटरवर पहिला अधिकार तालुक्यातील रूग्णांचा आहे. सध्या कोविड सेंटर हाऊसफूल आहे. येथील रूग्णांनाच बेड कमी पडतात. तालुक्यातील पेशंटला देवून जागा शिल्लक राहील्या तर बाहेरच्या रूग्णांबाबत नक्की विचार करावा पण प्रशासनाने बाहेरच्या रूग्णांसाठी बळजबरी केली तर आम्ही तिव्र विरोध करू.

राहाता तालुक्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत, बाहेरच्या तालुक्यातून येवून बैठका घ्या पण आमचे नियोजन विस्कळीत करू नका, राहाता तालुक्यात आम्ही कुणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही असा इशारा विखेंनी दिला.

हवं तर रूग्णांना येथे पाठवण्यासाठी संस्थानशी संपर्क करून त्यांच्या इमारती घ्या, मात्र रूग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्या तालुक्यातून आरोग्य यंत्रणा आणा, असा सल्लाही खासदार विखे यांनी दिला.

मंत्र्यांनी केवळ बैठका घेवून फोटोसेशन करत अधिकाजयांना सुचना देण्याऐवजी रेमडेसीवीर, ऑक्सीजनची स्वत: उपलब्धता करून दाखवा जिल्ह्यातील प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक सेंटरला पाचशे रेमडेसीवीर उपलध्द करून द्यावे असे आवाहन खासदार विखे यांनी जिल्ह्यातील मंत्र्यांना केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com