खा. लोखंडे अंगरक्षक धक्काबुक्कीप्रकरणी लिप्टेसह इतर चौघे पोलिसांसमोर हजर

खा. लोखंडे अंगरक्षक धक्काबुक्कीप्रकरणी
लिप्टेसह इतर चौघे पोलिसांसमोर हजर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

खा. सदाशिव लोखंडे यांच्या अंगरक्षकाने उदय लिप्टेसह चौघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीस लिप्टे व त्यांच्या सहकार्‍यांचा शोध घेत होते. काल सायंकाळी लिप्टे व त्याचे सहकारी भूषण राऊत, सौरभ बनकर, वृषभ काळे व पुष्पराज खैरनार हे पढेगाव येथील जुने ग्रामपंचायत समोर येवून पोलिसांसमोर हजर झाले.

यावेळी लिप्टे म्हणाले मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मित्राचे आजोबा आजारी असताना रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून आम्ही रिक्षामध्ये त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मी व माझे सहकारी खा. लोखंडे यांच्याकडे रुग्णवाहिका मागणीचे निवेदन घेऊन गेलो असता त्या ठिकाणी त्यांच्या वॉचमनने अडवले. दरम्यान त्यांच्या शेडमध्ये लावलेल्या दोन गाड्या वरील अच्छादन काढून बघितले असता त्या मला रुग्णवाहिका वाटल्या. खा. लोखंडे तेथे नसल्यामुळे आम्ही तिथून निघून आलो. मात्र घरी जात असताना रेल्वे गेटमध्ये खा. लोखंडे यांचे अंगरक्षक उंडे हे त्या ठिकाणी भेटले व त्यांनी मला दमबाजी करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्या विरोधात पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याची खोटी फिर्याद दिली. त्यामुळे आज सर्व गावकर्‍यांना समोर मी व माझे सहकारी पोलिसांसमोर स्वतःहून हजर होत आहे, परंतु जोपर्यंत खा. लोखंडे यांचे अंगरक्षक आमच्यावरील खोटा गुन्हा मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही जामीन घेणार नाही असेही उदय लिप्टे म्हणाले.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे, सरपंच किशोर बनकर, नेताजी फाऊंडेशनचे रंजीत बनकर, अशोक कारखान्याचे संचालक नितीन बनकर यांनी उदय लिप्टे व त्यांच्या सहकार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, खा. लोखंडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या तरूण वरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली. उदय लिप्टे व सहकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गावकर्‍यांनी खा. सदाशिव लोखंडे यांच्या निषेधार्थ मोठी घोषणाबाजी केली.

दरम्यान अटक केलेल्या या पाचही जणांना आज दि. 16 रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com