
शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
मतदारसंघातील रखडलेले प्रश्न तसेच विविध विकासकामे डोळ्यासमोर ठेवून मी शिंदे गटासोबत गेलो आहे, असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. दरम्यान खा. लोखंडे यांच्या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेनेला राजकीय खिंडार पाडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे खासदारही त्यांच्या गळाला लागणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथील एका बैठकीत शिवसेनेला सोडण्याचे काहीसे संकेत दिले होते. त्यावर काल मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.
मतदारसंघातील रखडलेले प्रश्न तसेच विविध विकासकामे डोळ्यासमोर ठेवून मी शिंदे गटासोबत गेलो आहे. गेली दोन वर्षांपासून आम्हाला राज्य अथवा केंद्र सरकारकडून निधी मिळाला नाही. शिर्डी मतदार संघातील निळवंडे पाटपाणी प्रश्न, समुद्राला वाहून जाणारे पश्चिमचे पाणी पूर्वेला वळविणे, ऊस उत्पादक शेतकर्यांना साखरेबरोबरच इथेनॉलचा पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता इथेनॉलचे प्रकल्प उभे करणे यासह प्रलंबित विकासकामे व रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत म्हणून मी शिंदे गटासोबत असून यापूर्वीच्या काळातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मतदार संघातील विकासकामांंसाठी मदत केली आहे. आपल्या सोबत स्थानिक काही शिवसैनिक नाहीत यासंदर्भात विचारले असता जे शिवसैनिक माझ्यासोबत येतील त्यांचे स्वागतच आहे. ज्यांना यायचे नसेल तो त्यांचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
खा. लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने राहाता शिर्डी येथील शिवसैनिकांशी संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अवघ्या सतरा दिवसात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर खासदार बनलेल्या सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेने काही कमी केले नसून एवढं करूनही ते जर उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून गेले तर आगामी काळात त्यांना शिवसैनिक मोठी राजकीय किंमत चुकवायला लावतील अशा संतप्त प्रतिक्रिया काहींनी बोलून दाखवल्या आहे.
दरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथील निवासस्थानास मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. शिवसैनिकांकडून त्यांच्या कुटुंबियांंना कोणत्याही प्रकारे त्रास होवू नये म्हणून बंदोबस्त देण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.