मंत्री, अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची सेना खासदारांची मागणी

निळवंडेवरून वादाची ठिणगी : डावलल्याने खा.लोखंडे संतप्त
मंत्री, अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची सेना खासदारांची मागणी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

निळवंडे आढावा दौर्‍यात मंत्री व अधिकार्‍यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी दौर्‍यात डावलल्याने संतप्त झालेल्या खा. सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यापेक्षा एक वर्षात लाभक्षेत्राला पाणी कसे मिळेल हे पाहिले पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. यामुळे राज्यात एकाच सरकारमधील मित्रपक्षातील नेत्यांमधील वाद समोर आला आहे.

खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूचा आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह आ. डॉ. सुधीर तांबे यांनी पाहणी दौरा केला. दौर्‍यावेळी सर्व अधिकारी व कार्यकर्ते मिळून शंभरच्यावर लोक जमवल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांची चौकशी करून मंत्री, पदाधिकार्‍यांवर देखील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे.

या विषयासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे. या पाहणी दौर्‍यावेळी सोशल डिस्टन्सिंगची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. डाव्या कालव्याचे पिंप्री निर्मळ येथे बंद पडलेले काम चालू करण्यासाठी मी गेलो असताना परिसरातील शेतकरी जमा झाले. तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर मग यांना वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे या सर्वांवर गुन्हे दाखल करून अधिकार्‍यांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी खा. लोखंडे यांनी केली आहे.

संबंधित कामे चालू करण्यासाठी यावेळी मी अधिकार्‍यांना बोलावले होते. मात्र मर्जीतील ठेकेदाराची मर्जी सांभाळण्यासाठी यावेळी संबंधित अधिकारी करोनाचे नाव व जमावबंदीचे कारण सांगून आले नव्हते. मग आज करोनाचे कोणतेही नियम का लागू नव्हते, असाही प्रश्न खा. लोखंडे यांनी उपस्थित केला आहे.

पन्नास वर्षांपासून दुष्काळी भागातील शेतकरी पाण्याची वाट पाहत आहे. संगमनेर जवळील घुलेवाडी परिसरातील कामाला कोणतीही गती नाही. टेल कॅनॉलची वर्क ऑर्डर होऊनही कामे सुरु नाही याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. अधिकारी त्याच त्याच कामाचे सातत्याने पाहणी दौरे काढून काय साध्य करू पाहत आहे, असाही प्रश्न लोखंडे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या कामाचा पाहणी दौरे आयोजित करण्यापेक्षा एक वर्षात लाभक्षेत्राला पाणी कसे मिळेल हे पाहिले पाहिजे, असा सल्लाही खा. लोखंडे यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com