
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कुकडी धरण प्रकल्पाच्या पाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे पक्षाचे पदही घ्यायचे, लोकांची सहानुभूती मिळवायची आणि दुसरीकडे आंदोलनही करायचे. परंतु कुकडीचे पाणी पुणे जिल्ह्यात कोण अडवतो आहे, याचा विचार करून नगरमधील राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा, असा टोला भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी लगावला.
कुकडीच्या पाण्यासंदर्भात श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या आंदोलनाच्या प्रश्नावर ते बुधवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कुकडीचे नगरचे हक्काचे पाणी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते अडवतात हे मी वर्षापूर्वी बोललो होतो. परंतु त्यावेळी त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. परंतु आता राष्ट्रवादीच्याच लोकांना त्याची झळ बसू लागली आहे. त्यामुळे त्यांना आता आंदोलन व जनजागृतीची आवश्यकता भासू लागली आहे. परंतु नगरला आजपर्यंत हक्काचे पाणी कधीच मिळाले नाही. आता या पाण्यासंदर्भात पुढील आठवड्यात जलसंपदामंत्री नगरमध्ये येऊन निर्णय घेतील, असेही विखे यांनी सांगितले.
कुकडीच्या पाण्यासंदर्भात खरा कळीचा मुद्दा आहे तो माणिकडोह ते डिंभे बोगद्याचा. त्याच्या चतुर्थ प्रशासकीय मान्यतेचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पुढील महिन्यात होणार्या बैठकीत घेतला जाईल, असेही खा. विखे यांनी सांगितले. कुकडीचे सर्कल कार्यालय फडणवीस सरकारच्या काळात नगर जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते परत पुण्यात हलवण्यात आले, अशी ही माहिती त्यांनी दिली.
दोन हजार रूपये किमतीच्या नोटा बंद केल्याची झळ सर्वसामान्यांना बसलेली नाही, बँकेतही कुठे रांगा लागलेल्या दिसत नाहीत, त्या सहज बदलून मिळत आहेत. परंतु ज्यांनी नोटा निवडणुकीसाठी साठवून ठेवल्या, तेच लोक द्वेष भावनेतून आरोप करत आहेत. हा निर्णय आरबीआयने स्वतंत्रपणे घेतला आहे. त्यामध्ये सरकारचा समावेश नाही. असाही दावा खासदार विखे यांनी यावेळी बोलताना केला.