आधीच्यांची पापे फेडत असल्याचे लक्षात येताच तनपुरे कारखाना सोडला

खा. डॉ. सुजय विखे यांचा दावा
आधीच्यांची पापे फेडत असल्याचे लक्षात येताच तनपुरे कारखाना सोडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहुरीचा डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद होता. परंतु आपण तो स्वतः निधी घालून पूर्णतः नवीन केला व 6 वर्षे सक्षमपणे चालवला. परंतु आधीच्यांची पापे मला फेडावी लागत असल्याचे लक्षात आले. अचानक अर्ज भानगडी सुरू झाल्या. वकील उभे राहिले, दावे दाखल झाले. अज्ञातवासात असलेले सत्ताधारी झाल्यानंतर दुसरे काय होणार? हे लक्षात घेऊन मी कारखाना सोडला, असा दावा भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांनी केला.

राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून ताब्यात घेऊन त्याला सील ठोकले आहे. सुमारे 111 कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सद्य परिस्थितीकडे लक्ष वेधले असता खा. विखे यांनी हा गौप्यस्फोट केला. ते मंगळवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कारखाना पूर्णतः नवीन करण्यासाठी मी माझे स्वतःचे 50 कोटी रुपये खर्च केले. यापेक्षा जास्त निधी देऊ शकत नव्हतो.

मी सहा वर्ष कारखाना चालवताना उच्चांकी गाळप केले. उच्चांकी रिकव्हरी दाखवली. कामगार व ऊस उत्पादक शेतकर्‍यांची देणी दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पूर्वीच कारखाना ताब्यात घेतला होता. बँकेकडून आम्ही चालवण्यास घेतला होता, असेही खा. विखे यांनी स्पष्ट केले. कारखान्यांची जमीन, मालमत्ता सर्व गहाण पडले आहे. त्यामुळे त्यावर कर्ज देण्यास कोणतीही बँक तयार नाही.

नियमानुसार बँकांना बंधने आहेत. त्यामुळे आपण जिल्हा बँकेला प्रस्ताव देऊन कारखान्यांच्या कर्जासाठी 500 रुपये टॅगिंग लावण्याऐवजी मी 100 रुपये टॅगिंगची मागणी केली होती. बँकेने त्याला नकार दिला. हे सर्व माझ्या अर्थकारणात बसत नव्हते, त्यामुळे कारखाना चालवण्यास असमर्थ असल्याची मी सांगितले, असेही विखे म्हणाले. आजही मला कोणत्या बँकेने कर्ज दिल्यास मी पुन्हा कारखाना चालवू शकतो असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

तनपुरे यांनी जिल्हा बँकेकडे अर्ज करावा

त्यांच्या आजोबांचे नाव कारखान्यांला दिले त्यांनी कारखाना चालवण्यासाठी पुढे यावे. जुन्या यंत्रसामुग्रीऐवजी आधुनिक कारखाना चालवण्यास मिळणार आहे. त्यामुळे राहुरीच्या लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन जिल्हा बँकेकडे अर्ज करावा. मी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना भेटून परवानगी मिळवून देतो, असे आवाहनही भाजपचे खा. विखे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com