पंतप्रधान मोदी यांच्या सभेला राहुरीकरांनी गर्दीचा उच्चांक करावा - खा. डॉ. विखे

सुरत-हैद्राबाद मार्गाबाबत महसूलमंत्री शेतकर्‍यांसोबत || दिल्लीत बैठका घेऊन काय साध्य होणार
पंतप्रधान मोदी यांच्या सभेला राहुरीकरांनी गर्दीचा उच्चांक करावा - खा. डॉ. विखे

उंबरे |वार्ताहर| Umbare

सुरत-हैद्राबाद महामार्ग रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होत असताना राज्याचे महसूलमंत्री ना.विखे हे शेतकर्‍यांसोबत असून माजी मंत्री कर्डिले व आपण शेतकर्‍यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही. परंतु काहींच्या दिल्लीत बैठका घेऊन काय साध्य होणार? असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथे होणार्‍या सभेला राहुरी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेे ,असे आवाहन खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

राहुरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील दि.26 ऑक्टोबर रोजी होणार्‍या सभेच्या नियोजनाबाबत जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना खा.डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.

खा.डॉ. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावेळी होणारा दौरा हा महत्त्वाचा आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक योजना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. आयुष्मान भारत आरोग्य कार्ड योजना, स्वामित्व योजना, महिला बचत गटांना कर्ज योजना, दिव्यांगांना साहित्य वाटप अशा अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गावात नियोजन करून सभेला उपस्थित राहावे.

राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या सुरत-हैद्राबाद महामार्गाच्या रस्त्याच्या संबंधित भूसंपादन प्रक्रिया होत आहे. याबाबत महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकर्‍यांसोबत आहेत. आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मात्र सदर विषय महसूल विभागाशी संबंधित असताना काहीजण दिल्लीत बैठका घेत आहेत. यातून काय साध्य होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल अशा योजना राबविल्या आहेत. अनेक लाभार्थींना याचा लाभ झाला आहे. त्यामुळे सर्वांनी सभेला उपस्थित राहावे. राहुरी शहरात भैय्यासाहेब शेळके यांनी शहरातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शासनाच्या सर्व योजनांची पुस्तिका तयार करून नागरिकांना वाटप सुरू केले आहे. त्याचप्रमाणे तांदूळवाडी येथे विनित धसाळ यांनी आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेच्या मोफत कॅम्पचे आयोजन केले, असे उपक्रम सर्वांनी राबवावेत असे सांगितले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, शिवाजी सोनवणे, माजी संचालक उत्तमराव म्हसे, सुरसिंग पवार, के. मा. कोळसे, रविंद्र म्हसे, अर्जुन पानसंबळ, शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, शहराध्यक्ष गंगाधर सांगळे, माजी सभापती भीमराज हारदे, सर्जेराव घाडगे, नानासाहेब गागरे, उत्तम आढाव, गोरक्षनाथ तारडे, शरदराव पेरणे, दत्तात्रय ढुस, आशिष बिडगर, दिपक वाबळे, शिवाजी साठे, सोपान गागरे, सतीश ताठे, पाराजी धनवट, प्रभाकर हरिश्चंद्र, संदीप घाडगे, मारुती नालकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित हाते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com