राहुरी तालुक्यातील सर्वच संस्थांवर भगवा फडकवू- खा. डॉ. सुजय विखे पाटील

बाजार समितीची तनपुरेंनी लूट केली- कर्डिले; विकास मंडळ, परिवर्तन मंडळ व भाजप कार्यकर्त्यांची बैठक
राहुरी तालुक्यातील सर्वच संस्थांवर भगवा फडकवू- खा. डॉ. सुजय विखे पाटील

उंबरे |वार्ताहार| Umbare

राहुरी तालुक्यातील सर्व संस्थांवर विकास मंडळ परिवर्तन मंडळ व भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली निवडणूक लढवून भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. राहुरी नगरपालिका मतदारांनी ताब्यात दिल्यास शहराच्या विकासासाठी देशाचे नेते अमित शहा यांच्याकडून पन्नास कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊ, सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, नगरपालिका, डॉ.तनपुरे कारखाना, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

खा. डॉ. विखे म्हणाले, राहुरी तालुक्यातील असलेल्या सर्व संस्थांवर आजपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी कुठलेही काम केलेले नाही. सत्ता ताब्यात ठेवून लोकांना वेठीस धरण्याचे काम केले. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे आजपर्यंत वाटोळे खरे तर तनपुरे घराण्यानेच केले आहे. या कारखान्याविषयी बोलण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. कारखाना निवडणुकीमध्ये सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकून कारखाना आमच्या ताब्यात दिला.

आम्ही कारखाना सुरळीतपणे चालवला आहे. या गळीत हंगामाला कारखाना बंद ठेवण्याचे कारण कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये चार लाख टनापेक्षा जास्त उसाचे क्षेत्र नव्हते. सर्वजण चर्चा करत होते, नऊ लाख टन ऊस या परिसरामध्ये शिल्लक आहे. परंतु, तशी परिस्थिती नव्हती. आकडे फुगवण्यात आले होते. मी कारखाना सुरू करण्याच्यावेळी जर हे वाक्य बोललो असतो तर शेतकर्‍यांच्या ऊस तोडणीसाठी शेतकर्‍यांना त्रास झाला असता. कारखाना बंद ठेवल्यामुळे कारखान्याची कुठल्याही प्रकारे नुकसान झालेले नाही. परंतु, कारखाना सुरू केला असता तर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले असते.

सभासदांना न्याय देण्याचे काम केले आहे. काही शेतकर्‍यांचे पेमेंट देणे बाकी आहे. येत्या दहा दिवसांमध्ये तेही पेमेंट देण्याची व्यवस्था करणार आहोत. मुळा प्रवरा वीज संस्थेचे वाटोळे करण्याचे काम या मंडळींना केले आहे. ही संस्था उजिर्र्तावस्थेत राहावी, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून आम्ही न्यायव्यवस्थेचे दरवाजे ठोठावले आहेत. त्याचा निकालही लवकर लागण्याची शक्यता आहे.

मुळा-प्रवरा निवडणूक ही लवकरच होऊ घातली जाईल. या निवडणुकीतही सर्वांनी जातीने लक्ष देऊन लढण्याची गरज आहे. राहुरी नगरपालिका गेल्या अनेक वर्षांपासून यांच्या ताब्यात असताना त्या नगरपालिकेच्या मार्फत कोणतीही नागरी सुविधा आजपर्यंत मिळालेली नाही त्यांच्या सोयीनुसार या नगरपालिकेचा वापर केला जातो. राहुरी नगरपालिकेच्या कचरा डेपोसाठी महाराष्ट्र शासनाची जागा लवकरच हस्तांतर करण्यात येणार आहे तसेच सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा राहुरी ग्रामिण रुग्णालयासाठी यांनी यांच्या कालखंडामध्ये काय केले.

स्वतःला काही करता आले नाही. दुसरे करतात त्यांनाही नाव ठेवण्याचे काम हे करत आहेत. नगरपालिकेच्या दवाखान्यासाठी दहा कोटींचा दवाखाना उभारण्यात येणार असून यासाठी शासनाच्या जागाही देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. जोपर्यंत आघाडीचे सरकार होते. तोपर्यंत काही करता नाही आले. आता मात्र चोर आणि दरोडेखोर आपल्यावर आरोप करीत आहेत.

निवडणूक लागल्यावर त्यांचा सगळा समाचार घेतला जाईल. डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी लवकरच प्रसिद्ध होणार असून या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक संघाने निवडणूक लढवून कारखाना आपल्या ताब्यात घेऊन पुन्हा राहुरी कारखाना कायमचा चालू ठेवण्यासाठी आता आपण पूर्णपणे ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीच्या माध्यमातून संधी देण्याचे काम आम्ही करणार आहोत. सत्तेचा वापर आपण सर्वसामान्यांच्या कामासाठीच करणार आहोत, असे प्रतिपादन खासदार डॉ विखे यांनी केले आहे.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीमध्ये विखे काँग्रेसमध्ये तर मी भाजपा मध्ये होतो. त्यामुळे निवडणूक लढवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी ही निवडणूक लढवून चार जागा आपण जिंकल्या होत्या. तिरंगी लढत झाली होती. परंतु यावेळेस विखे आणि मी एकाच पक्षात असून आता प्रत्येक निवडणूक ताकदीनुसार लढवली जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवून ताब्यात घेणार आहोत व या संस्थेमध्ये सर्व शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम करणार आहोत. आजपर्यंत एकहाती सत्ता ठेवून यांनी या संस्थेची पूर्णपणे लूट केली आहे

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये हा कारखाना ज्यांच्या ताब्यात जाईल, त्यांना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून निश्चित मदत केली जाईल, असे आम्ही त्यावेळेस जाहीर केले होते. कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर सभासदांनी खा. डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात कारखाना दिला. यावेळी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे हित जपून व कामगाराला ही न्याय मिळेल. तनपुरेंनी कारखान्याचे वाटोळे केले. त्यामुळे शेतकरी सभासदांना पूर्णपणे त्यांची चिड निर्माण झाली होती.

विखें च्या ताब्यात कारखाना देऊन त्यांनी पाच वर्षे कारखाना चांगल्याप्रकारे चालवला. कारखान्याच्या मार्फत कामगार सभासदांना न्याय देण्याचे काम केले. बँकेला नाइलाजास्तव कारखाना ताब्यात घेण्याची वेळ आली. डॉ. तनपुरे कारखाना विखे सोडून कोणीही चालू शकत नाही. तसेच मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था या सर्व निवडणुका महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री कर्डिले यांनी केले.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीसाठी डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, शामराव निमसे, सुरसिंग पवार, शिवाजी शिक्षण मंडळाचे जनरल सेक्रेटरी महेश पाटील, राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, बाळकृष्ण बानकर, विक्रम तांबे, आर. आर. तनपुरे, उत्तमराव म्हसे, किशोर वने, उत्तमराव आढाव, नंदकुमार डोळस, अमोल भनगडे, शिवाजी डौले, कारभारी डौले, शिवाजी सयाजी गाडे, मच्छिंद्र तांबे, विजयराव बानकर, केशवराव कोळसे, दत्तात्रय खुळे, रवींद्र म्हसे, गोरक्षनाथ तारडे, सुरेशराव बानकर, भीमराज हारदे, सर्जेराव घाडगे, शिवाजी सागर, महेंद्र तांबे, राजेंद्र उंडे, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे, आशिष बिडकर, पाराजी धनवट, जालिंदर आढाव, शिवाजी साठे, आनिल आढाव, अर्जुन बाचकर, डॉ. पंकज चौधरी, मधुकर पवार, सीताराम ढोकणे, सुभाष वराळे, कैलास पवार, उमेश शेळके, उत्तम खुळे, विराज धसाळ, जब्बार पठाण, विजयराव कांबळे, अनिल दौंड, प्रभाकर हरिश्चंद्रे, शरद म्हसे, उमाकांत हापसे, लक्ष्मण नवाळे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com