
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
15 वर्षे मंत्रीपद भोगणार्या शेजारच्या महसूलमंत्र्यांनी 15 वर्षांत केले नाहीत एवढी कामे सध्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका वर्षात केली, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
साकुरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत हाते. याप्रसंगी गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, अॅड. रघुनाथ बोठे, संचालक विजयराव गोर्डे, भाऊसाहेब जेजुरकर, शिवाजी गोंदकर, अभय शेळके, गंगाधर बोठे, नंदकुमार गव्हाणे, विरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने, दीपकराव रोहोम, नानासाहेब बोठे, वाल्मिकराव गोर्डे, सुरेश गाडेकर, सतीश बावके, भारत लोखंडे, सचिन मुरादे, संदीप दंडवते, अॅड. रवींद्र बोरकर, गोटू सदाफळ, प्रा. बाळासाहेब गाडेकर, ज्ञानेश्वर सदाफळ, गंगाधर बोठे, हेमंत गोर्डे, प्रकाश पुंड उपस्थित होते.
खा. विखे म्हणाले, ना. विखे पाटील यांच्या रुपाने आपल्याला मंत्रीपद नवे नाही. त्यामुळे आपल्याला विशेष वाटत नाही. मात्र जे मलई खातात त्यांना महसूलमंत्रीपद मोठे वाटते. राज्यातील महसूल विभागातील 140 प्रांत, 150 तहसीलदारांच्या बदल्या केल्या. परंतु महसूलमंत्री विखे पाटील यांच्यावर पैसे खाल्ल्याचा एक तरी आरोप झाला का? शेजारचे महसूलमंत्री होते, त्यावेळी ते पिंपळस, दहेगावला आले का? आता आले. त्यांना जे करायचे ते करू द्या, तुम्ही कार्यकर्ते आमची ताकद आहात.
वाळू तस्कारांना आपण पोसत नाही. 10 कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी 600 रुपये ब्रासने वाळू देऊ. बदल्यांमध्ये पैशाचा मोह त्यागला. ना. विखे पाटील यांच्या विविध विकासाच्या कामांचा व महसुल मधील बदलांचा उल्लेख करत खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्राला ना. विखे पाटील यांच्यासारखा महसूलमंत्री कधी लाभला नाही. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने खडकेवाके येथे 10 कोटींच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली असल्याचे सांगत खासदार डॉ. विखे म्हणाले, शेळ्या मेंढ्यांचा प्रकल्प होणार आहे. लोकर, ब्रिडींग, मांस निर्यात, उपपदार्थ निर्मिती तेथे होणार आहे. या प्रकल्पातून 200 ते 300 तरुणांना नोकरी मिळू शकेल. या तरुणांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. विखे म्हणाले.प्रास्तविक प्रमोद रहाणे यांनी केले.