आपल्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याने सर्वांगीण विकास होणार - खा. डॉ. विखे

आपल्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याने सर्वांगीण विकास होणार - खा. डॉ. विखे

नांदुर्खी |वार्ताहर| Nandurkhi

मंत्रीपद असताना अनेक वेळा नगर जिल्ह्याऐवजी इतर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची संधी मिळायची. मात्र आता महसूलमंत्री या महत्वाच्या पदाबरोबरच आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याने जिल्ह्याचा चांगला विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे यांनी राहाता तालुक्यातील नांदुर्खी खुर्द येथील शिवरस्त्याच्या पाहणीप्रसंगी केले.

ते म्हणाले, अनेक वर्षांपासून शिवरस्त्याचा प्रश्न गंभीर होत असून या अतिक्रमणाच्या पापापायी अनेक तंटे न्यायालयात चालू आहेत. या सर्व बाबी लक्षात आल्याने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व गावातील शिवरस्त्याचा प्रश्न सरकारी मोजणी करून शिवरस्ता खुला करण्याचे काम हाती घेतले आहे. सर्व शासकीय यंत्रणेमार्फत या कामाची आधुनिक पद्धतीने पाहणी करून शिवरस्त्याचा प्रश्न मार्गी निघणार आहे. तरी प्रत्येकाने याकामी सहकार्य करावे. त्यांनी दुचाकीवर बसून नांदुर्खी खुर्द गावातील सर्व शिवरस्त्याची पाहणी करून हे काम लवकर मार्गी लागणार असल्याचे सांगितले.

आमचा न्यायदेवतेवर विश्वास असून आगामी येणार्‍या साई संस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये राजकीय लोकांना संधी नसावी या गोष्टीशी आपण 100 टक्के सहमत आहोत. मात्र मागील विश्वस्त मंडळात ज्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला अशांना विश्वस्त होण्याची संधी मिळाली म्हणून नवीन विश्वस्त मंडळावर आपली नजर असेल. विजयादशमीच्या निमित्ताने चांगल्या कामाची सुरुवात नांदुर्खी गावातून करत असल्याने याचा आपल्याला सर्वस्वी आनंद होत असल्याचे खा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

नांदुर्खी खुर्द ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार रामनाथ वाणी, अण्णासाहेब वाणी, आप्पासाहेब वाणी, जालिंदर वाणी, गोरखनाथ वाणी, सरपंच बापूसाहेब वाणी, उपसरपंच सतीश वाणी, सुनील वाणी, जनार्धन वाणी, दत्तू वाणी, सोमनाथ वाणी आदींसह ग्रामस्थांनी केला. यावेळी डोर्‍हाळ्याचे उपसरपंच बाळासाहेब डांगे, नानासाहेब डांगे, कनकुरीचे सरपंच ज्ञानेश्वर डांगे, नांदुर्खी खुर्द सोसायटीचे चेअरमन जालिंदर वाणी, नांदुर्खी बुद्रुक सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव चौधरी, कचेश्वर चौधरी, नबाजी डांगे, संदीप बढे, राजेंद्र सदाफळ, भाऊसाहेब मोगल आदींसह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वसंत वाणी यांनी तर आभार आप्पासाहेब वाणी यांनी मानले.

सन 2022 हे वर्ष खूप भाग्याचे असून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना सत्तासंघर्षामध्ये महसूलमंत्रीपद मिळाले तर नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मिळाले. सगळीकडे भरपूर पाऊसही झाला तर आपणालाही पुत्ररत्न प्राप्त झाले. यामुळे हे वर्ष खूप भाग्याचे आहे, असे खा. डॉ. सुजय विखे बोलताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com