केवळ आंदोलनाने प्रश्न सुटत नसतात - खा. डॉ. विखे

आ. लंके यांचे नाव न घेता लगावला टोला
केवळ आंदोलनाने प्रश्न सुटत नसतात - खा. डॉ. विखे

करंजी |वार्ताहर| Karanji

कल्याण - निर्मळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विलंब झाला हे मान्य, परंतु मी खासदार झाल्यानंतर या कामाला आणखी गती देण्याचा प्रयत्न केला. मी माझ्याच कामाचं श्रेय घेतो. इतरांच्या कामाचे श्रेय घेण्याचा मी प्रयत्न करत नाही. त्यामुळे पन्नास वर्षात विखे कुटुंबाला विरोधकांना भिक घालण्याची गरज पडली नाही. प्रत्येक प्रश्न आंदोलन उपोषण करून सुटत नसतो त्याला कागदोपत्री पाठपुरावा देखील करावा लागतो उगाच कोणाच नाव घेऊन त्याला मोठ करण्याची मला गरज नाही असा टोला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आ. लंके यांचे नाव न घेता लगावला.

खासदार विखे पाटील रविवारी पाथर्डीकडे जात असताना करंजी येथे थांबून कार्यकर्त्यांसोबत वनभोजन केले परिसरातील अनेक कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून कार्यकर्त्यांच्या प्रश्नांचा निपटारा केला. त्यानंतर खासदार विखे पाटील यांनी करंजी येथे सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी केली यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

खा. विखे म्हणाले, मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारने या रस्त्यासंदर्भात आम्हाला बदनाम करण्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहण केल्यानंतर शेतकर्‍याला मोबदला देण्यास विलंब करत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदे फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर या रस्त्यासह अनेक विकास कामांना विविध योजनाणा निधी उपलब्ध करून गती देण्याचे काम केले असून मार्च अखेर या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवले जातील.

तर मे अखेरीस या महामार्गाचे काम पूर्ण होईल. दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याला निधी देण्याचे काम सुरू असून आमदार मोनिका राजळे यांच्या मागणीवरून 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. येत्या सहा महिन्यात बहुतांश गावांमध्ये विकास निधी पोहोचला जाईल. यामुळे येथील विकास कामांना अधिक गती येईल असे ते म्हणाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय रक्ताटे, बंडू पाटील बोरुडे, जेष्ठनेते संभाजीराव वाघ, अरुण पाटील आठरे, माजी पं स सदस्य एकनाथ आटकर, माजी सभापती मिर्झा मणियार, सरपंच बाळासाहेब अकोलकर, सचिन शिंदे, माजी सरपंच भाऊसाहेब क्षेत्रे, सुनील साखरे, पृथ्वीराज आठरे, कुशल भापसे, अशोक आठरे, युवानेते नामदेव मुखेकर, राजेंद्र मरकड, माजी चेअरमन उत्तम अकोलकर, सुधाकर अकोलकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष सुभाष अकोलकर, उपसरपंच नवनाथ आरोळे, बाबासाहेब मोरे, शेखर मोरे, भागवत शिंदे, संदीप दानवे, अमोल शिंदे, महामार्गाचे उपअभियंता दिलीप तारडे, विद्या पवार यांच्यासह रस्त्याच्या कामाचे ठेकेदार बी जे. देशमुख उपस्थित होते.

लवकरच दूध का दूध पाणी का पाणी

येणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोण किती कामाचा आहे? कोणी किती विकास कामे केली? हे येणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून येईल.यावेळी दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होईल असे म्हणत खासदार विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेवर देखील भाजपचेच कमळ फुलणार असल्याचे स्पष्ट संकेत यानिमित्ताने दिले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com