केंद्र सरकारचे नऊ वर्षाचे काम गरिबांच्या कल्याणासाठी - खा. डॉ. विखे

खा. डॉ. सुजय विखे
खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले असून या नऊ वर्षात देश सेवा, सुशासन, तसेच गरीब कल्याणकारी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राबविल्या असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मोदी 9 (मोदी एट नाइन) या भाजपाच्या केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येणार्‍या जनसंपर्क अभियाना संदर्भात माहिती देण्यासाठी खा. डॉ. विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहरअध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थिती होते. खा. डॉ. विखे म्हणाले की , केंद्रात 2014 मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हाची परिस्थिती आणि आज नऊ वर्षानंतरची परिस्थिती पाहता अमुलाग्र बदल झालेला असल्याचे आपणास लक्षात येईल. यात प्रामुख्याने गरीब कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा उल्लेख करता येईल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशात करोडो गरिबांसाठी घरे बांधून देण्यात आली आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ योजनेद्वारे पिण्याचे पाणी पोहचविण्यात आले आहे. शेतकरी सन्मान योजना, पीक विमा या सारख्या अनेक लोककल्याणकारी योजना या राबविल्या जात आहेत. अशा योजनेतून गरिबांचे कल्याण या बरोबरच महिला सक्षमीकरण धोरण हे देखील अत्यंत प्रभावीपणाने या नऊ वर्षात राबविले आहे. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तरी या जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी हा रस्ते, पायाभूत सुविधा, विमानतळ या सारख्या विविध बाबी करिता मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे.

अलीकडे विरोधकांना काय काम उरले नसल्याने जातीय व्देष, दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम हे सध्या होत आहे. नवीन उद्योजकांसाठी स्टार्टअप सारख्या योजना देखील गेल्या आहेत. याकरिता केलेल्या कामाचा आढावा त्यांनी दिला. तसेच भाजप पदाधिकारी यांच्यासमवेत सदर अनुषंगाने बैठक घेऊन त्यांना एक महिन्यात होणार्‍या उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीस भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com