महाविकास आघाडीच्या काळात उद्योग व्यवसाय राज्याबाहेर गेले

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे उद्योगांचे स्थलांतर थांबले - खा. विखे
खा. डॉ. सुजय विखे
खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात टक्केवारीचा कारभार वाढला होता. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी होती. अनेक एमआयडीसींमध्ये उद्योजकांना त्रास सहन करावा लागले. राजकीय हस्तक्षेप वाढला होता. लोकप्रतिनिधींनाच ठेक्याचा लाभ मिळत होता. यावर निर्बंध घालावेत, इज ऑफ डूइंग बिझिनेस मिळावा अशी उद्योजकांची मागणी होती. यामुळे उद्योग व्यवसाय राज्या बाहेर जात होते. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे उद्योजक महाराष्ट्रात थांबत असल्याचा दावा भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.

नगरमध्ये शनिवारी खा. विखे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या कारभारामुळेच उद्योजकांनी राज्याबाहेर धाव घेण्यास सुरुवात केली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे उद्योजक महाराष्ट्रात थांबत आहेत. देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांना आपले प्रस्ताव देण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही इतर ठिकाणी जाऊन प्रस्ताव देत असतात. शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्रातील उद्योग पुन्हा वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते अजित पवारछत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते यावर ठाम आहेत. तसेच यासंदर्भात काँग्रेस व शिवसेना यांनीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, याकडे लक्ष वेधले असता खा. विखे म्हणाले, काँग्रेस भूमिका स्पष्ट करू शकत नाही. शिवसेना आता केवळ दोन आमदारांपुरती शिल्लक राहिली आहे. पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असतील तर छत्रपतींचे अनुयायी, शिवभक्त येणार्‍या निवडणुकीत योग्य उत्तर देतील.

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्यातील वादंगाकडे लक्ष वेधले असता विखे म्हणाले की, खा. राऊत यांच्या वक्तव्याकडे महाराष्ट्रातील जनता कधी गांभीर्याने पहात नाही. नारायण राणे मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी टीका टिप्पणी करणे योग्य नाही. परंतु दोघातील कसरत पाहता प्रत्येक पक्षाने त्यांच्या प्रवक्त्यावर निर्बंध आणण्याची गरज असल्याचे लक्षात येते, असे स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com