मोदींचा सर्वसामान्यांचे अश्रु पुसण्याचा वारसा पुढे चालवूया - खा. डॉ. विखे

कुळधरण येथे शासन आपल्यादारी उपक्रमात आवाहन
मोदींचा सर्वसामान्यांचे अश्रु पुसण्याचा वारसा पुढे चालवूया - खा. डॉ. विखे

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सर्वसामान्य, गरीब, वंचित, दिव्यांग यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपणही हा वारसा पुढे चालवूया, असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी येथे केले.

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे शासन आपल्या दारी योजने अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्याहस्ते आवश्यक असलेली कागदपत्रे, रेशन कार्ड यासह विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाअध्यक्ष शेखर खरमरे, दीपक पाटील, बापूसाहेब नेटके, शांतिलाल कोपनर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधताना खा. विखे म्हणाले, जनतेच्या मनातील सरकार असल्याने सर्व योजनांचा लाभ आता नागरिकांना मिळत आहे, मागील आघाडी सरकारच्या काळात काही दिल्याशिवाय काही मिळत नव्हते. मात्र आमच्या महायुतीचे सरकार आल्यावर आम्हीच तुम्हाला जे जे हवं ते देण्यासाठी तुमच्या दारी आलो आहोत. आघाडी सरकारच्या तीन वर्षांच्या कारभाराने आपले राज्य पाच दहा वर्षे मागे गेले.

परवाच महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा एकमुखाने धाडसी निर्णय घेतला. विरोधक यातही राजकारण करत असून निर्णय घेण्याचे धाडस हे फक्त मोदी यांनी केले. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, याबरोबरच स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे काम प्राधान्याने करावयाचे असून आता देशात आणि राज्यात आपले सरकार आहे. त्यामुळे तुम्ही मागणी करा त्यानुसार तुमचे काम करण्याचा शब्द याप्रसंगी खा.विखे यांनी दिला.

या कार्यक्रमा आधी कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास सचिन पोठरे, मंगेश पाटील, दादासाहेब सोनमाळी, सरपंच प्रभा पाटील तसेच शासकीय अधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकास कामांना जमिनीसाठी प्रयत्न

घन कचरा व्यवस्थापन, घरकुल, पाणीपुरवठा योजना यासाठी जर शासकीय जमीन लागत असेल तर त्याची यादी करून द्या. ती तुम्हाला राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देवू असे आश्वासन यावेळी खा. विखे यांनी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com