नगर दक्षिणेतील रस्त्यांचे भाग्य उजळणार

खा. डॉ. विखे यांच्या पाठपुराव्याला यश || 10 रस्त्यांसाठी 25 कोटी मंजूर
खा. डॉ. सुजय विखे
खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर दक्षिण मतदारसंघातील नगर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत, जामखेड व पारनेर तालुक्यांतील महत्त्वाच्या 10 रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले. या निधीमुळे अहमदनगर दक्षिण मतदार संघातील सात तालुक्यांच्या रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

नगर तालुक्यातील वाळुज ते वाकोडी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तीन कोटी आणि नगर- मनमाड रोड- नवनागापूर ते वडगाव गुप्ता रस्त्याच्या सुधारणेसाठी तीन कोटी, पारनेर तालुक्यातील रा.मा. 53 ते वडझिरे- पारनेर- सुपा- सारोळा- वाळकी- कौडगाव रस्ता सुधारणेसाठी तीन कोटी निधी मंजुर झाला. त्याचप्रमाणे राहुरी तालुक्यातील सोनगाव- सात्रळ- रामपूर- कोल्हार खु.- चिंचोली- गंगापूर- देवगाव- आंबी- अमळनेर- चांदेगाव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी एक कोटी, प्र.रा.मा. 8 राहुरी ते बारागाव- नांदूर- वावरथ ते ढवळपुरी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी चार कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाथर्डी तालुक्यातील मिरी ते तिसगाव रस्त्याच्या रूंदीकरण व सुधारणेसाठी तीन कोटी, मोहरी ते तारकेश्वर गड रस्ता रूंदीकरण व सुधारणेसाठी दोन कोटी, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव- खलु- कौठा- अजनुज- पेडगाव- शेडगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील रा.मा. 54- राशिन- अळसुंदे- निंबे- खातगाव- लोणी- मसदपूर- चापडगाव रस्ता सुधारणेसाठी दोन कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली. जामखेड तालुक्यात आष्टी- डोणगाव- अरणगाव- फक्राबाद- नान्नज- सोनेगाव- खर्डा या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामांकरिता एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या निधीमुळे मतदार संघातील सात तालुक्यांची गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी खा.डॉ. विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना भरीव यश लाभल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून, खा. डॉ. विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com