खा. डॉ. विखेंनी प्रवरा पॅटर्न पंढरपूरमध्येही दाखवून दिला

खा. डॉ. विखेंनी प्रवरा पॅटर्न पंढरपूरमध्येही दाखवून दिला

लोणी |प्रतिनिधी| Loni

वारकरी सांप्रदायाशी असलेला ऋणानुबंध विखे पाटील परिवारातील चौथ्या पिढीनेही जपल्याचा प्रत्यय पंढरपूरमध्ये वारकर्‍यांना आला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने जमलेल्या वारकर्‍यांशी थेट संवाद साधून खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यवस्थेचा प्रवरा पॅटर्न पंढरपूरमध्येही दाखवून दिला आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने येतात. या वारकर्‍यांना सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून विखे पाटील परिवाराने स्व. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या माध्यमातून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती वैष्णव सदन पंढरपूर येथे उभारले आहे. या सदनामध्ये वारकर्‍यांची निवासाबरोबरच सर्व व्यवस्था ठेवली जाते. या सुविधेचा लाभ वारकर्‍यांना चांगल्या प्रकारे होत असल्याचा प्रत्येय वारीच्या निमित्ताने आला.

विखे पाटील वैष्णव सदनामध्ये राज्यातील विविध भागांमधून आलेल्या 33 पेक्षा अधिक दिंड्यांमधील वारकरी या ठिकाणी थांबलेल्या आहेत. भजन, किर्तन आणि अध्यात्माचा आनंद घेवून आषाढीवारी करीत आहेत. या सर्व वारकर्‍यांची विचारपूस करण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील दोन दिवसांपासून पंढरपूरमध्ये होते. वारकर्‍यांशी संवाद साधत त्यांनी येथील व्यवस्थेची पाहणी केली.

अनेक वारकर्‍यांनी डॉ. विखे पाटील यांच्या आपुलकीचे कौतूक करुन विखे पाटील परिवार वारकर्‍यांप्रती देत असलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंदिरात जावून पांडुरंगाचे दर्शन घेतले. देवस्थानच्यावतीने खा. विखे पाटील यांचा सत्कार अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी केला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. सुहास देशमुख, आ. प्रशांत परिचारक यांच्यासह विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

वारकर्‍यांसाठी पंढरपूरमध्ये भक्त निवास असावे ही पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांची खुप इच्छा होती. दोन वर्षांपूर्वी हे सदन वारकर्‍यांसाठी विखे पाटील परिवाराने समर्पित केले आहे. राज्यभरातून येणार्‍या वारकर्‍यांना या सदनाचा आश्रय मिळावा हीच भुमिका यामागे होती. वारकर्‍यांप्रती अशा प्रकारे सेवा करण्याची आम्हाला मिळालेली संधी ही खुप मोठी आहे.

- आ. राधाकृष्ण विखे पाटील

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com