आ.थोरात दक्षिणेत आल्यास लढत रंजक होऊ शकते, काय म्हणाले खा. विखे...
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यासारख्या अनुभवी माणसाला जर काँग्रेसने नगर दक्षिण लोकसभेसाठी संधी दिली तर निश्चितच नागरिकांनाही आनंद होऊ शकतो आणि त्यांना उमेदवारी मिळाली तर निवडणुक स्पर्धात्मक व रंजक होऊ शकते, असे भाष्य करून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठनेते आ. थोरात यांचे नाव उमेदवारीबाबत चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार डॉ. विखे यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केले. केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष जनसंपर्क मोहीम भाजपने हाती घेतली आहे, त्याची माहिती खा. डॉ. विखे यांनी माध्यमांना दिली. नगर दक्षिणेसंदर्भातील आ. थोरात यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत बोलताना खा. डॉ. विखे म्हणाले, थोरात यांचे पक्षाचे काम व कार्य पाहता पक्षाने त्या दृष्टिकोनातून त्यांच्या नावाचा विचार केला असेल तर त्याचे स्वागत करणे व त्याला नकार देण्याचा अधिकार मला नाही.
मी काही काँग्रेसचा प्रवक्ता नाही, पण काँग्रेस पक्षाने त्यांना संधी दिली तर नगर जिल्हा त्याबाबत काय विचार करतो व भाजपचा उमेदवार कोण राहते यावरून त्यांचा निर्णय होऊ शकतो. थोरतांसारख्या अनुभवी माणसाला काँग्रेसने संधी दिली तर निश्चितच नागरिकांना आनंद होऊ शकतो आणि नगर दक्षिणेची निवडणूक स्पर्धात्मक व रंजक होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
नगर दक्षिणेतून मी निवडणूक लढवणार आहे किंवा नाही अशा चर्चांना अर्थ नाही, पक्षाची उमेदवारी पक्षश्रेष्ठी ठरवतात. जो उमेदवार असेल त्यांचे मी व भाजपचे कार्यकर्ते काम करू. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, त्यामुळे नगर दक्षिणेचा भाजपचा उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील, असे स्पष्टीकरणही विखे यांनी केले.
मिरवणुकातून औरंगजेबाचे फोटो झळकावणे, हे पोलिसांना उशिरा कळले आहे. पोलिसांनी आता कोंबिंग ऑपरेशन करून आरोपींना पकडावे तसेच पकडलेले आरोपी नगरचे नागरिक आहेत की नाही, हेही शोधावे. येथे शिकायला, नोकरी करायला आले असताना भरकटले काय हे पाहावे लागेल, पण जिल्ह्याचे रहिवासी नसलेले लोक जिल्ह्याची शांतता बिघडवत आहेत, असा दावाही विखे यांनी केला.
प्रत्येक घटनेला भाजपला जबाबदार ठरवणे हे चुकीचे आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी भाजप जागरूक राहणारच आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व उध्दव ठाकरेंची शिवसेना यांच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मागील तीन महिन्यात शांततेचे आवाहन तरी केले का? फक्त भाजप दंगल घडवते व मुस्लिम धोक्यात हेच ते बोलतात, पण हिंदुत्व हे द्वेष पसरवणारे नाही. दुसर्या समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ न देणे हे हिंदुत्व आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, सुपा परिसर हा उद्योजकता वाढीसाठी चांगला आहे. मात्र सुपा परिसरात नवे उद्योग का येत नाही याचा विचार करावा लागेल. उद्योजकांना तेथे का जावे वाटत नाही, हे पण शोधले पाहिजे, असा सूचक टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लावला.
मिरवणुकांचे मार्ग बदलले पाहिजे
जातीय तणावाच्या संगमनेरला दोन- तीन घटना घडल्या आहेत, शेवगावची दंगलही पूर्वनियोजित होती की नाही, हे पाहिले पाहिजे. मात्र, आता सर्वधर्मीयांच्या मिरवणुकांचे पारंपरिक मार्ग बदलले पाहिजे. प्रत्येक मिरवणूक गल्लीबोळात व बाजारपेठेतच गेली पाहिजे का, यावर चर्चा अपेक्षित आहे. प्रत्येकाने सण साजरा करताना संयम ठेवला पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही, असे भाष्यही खा. डॉ. विखे यांनी केले.