
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ऐनवेळी अपक्ष अर्ज दाखल करण्याच्या सत्यजित तांबे यांच्या निर्णयाबाबत प्रश्न माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाच विचारला पाहिजे. त्यांना काय वाटतंय, याबाबत ते अद्याप बोललेले नाहीत. या उमेदवारीचा निर्णय घरात एकत्र बसून झाला की नाही, याबाबतची स्पष्टता तेच देवू शकतात, अशी खोचक प्रतिक्रीया भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचा पाठिंबा असलेला उमेदवारच विजयी होणार, असा दावा त्यांनी केला.
खा.डॉ.विखे पाटील नगर येथे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत भाजपचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जो काही निर्णय पक्ष संघटनेच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून दिला जाईल, त्या सूचनांचे तंतोतंत पालन नगर जिल्ह्यात केले जाईल.
या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युतीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्यजित तांबे यांच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारताच याबाबत थोरातांनाच काय वाटतंय, याविषयी विचारावे, असे उत्तर माध्यमांना दिले.