राष्ट्रीय वयोश्री योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक लाभ वाराणसीनंतर नगर जिल्ह्याची नोंद - खा. विखे

शिर्डी येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेचा शुभारंभ
राष्ट्रीय वयोश्री योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक लाभ वाराणसीनंतर नगर जिल्ह्याची नोंद - खा. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचा जेष्ठ नागरीकांना मोठा आधार मिळाला आहे. वाराणसीनंतर या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक लाभ मिळवून देण्यात नगर जिल्ह्याची नोंद होईल असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या नोंदणीकरिता शिर्डी येथे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन केंद्रांवर तपासणी आणि नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी सकाळ पासूनच या तपासणी शिबिरातील सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला. तपासणी केंद्रावर आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने चौकशी करीत खा.डॉ.विखे यांनी त्यांना कागदपत्रासह सर्वच गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके यांच्यासह सर्व कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी आलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिश्रम घेतले.

तपासणी शिबिरात तीन स्वतंत्र केंद्र निर्माण करण्यात आली होती. कागदपत्र नोंदणी कक्ष, कागदपत्र पडताळणी कक्ष आणि आधार साहित्यांच्या मागणीसह कागदपत्र जमा करण्याच्या स्वतंत्र व्यवस्थेमुळे मोठ्या संख्येने आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या कक्षांपर्यंत सहज पोहचता येत होते. कान, डोळे आणि दातांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे स्वतंत्र पथक असल्याने ज्येष्ठ नागरिकांना क्रमाक्रमाने तपासणी करून घेणे अतिशय सोपे जात असल्याचे पाहायला मिळाले. आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी चहा, नाष्ट्याची व्यवस्था होती. प्रत्येक स्वयंसेवक याबाबत ज्येष्ठ नागरिकांना विचारणा करून त्यांची काळजी घेताना पाहायला मिळाला.

देशात राष्ट्रीय वयोश्री योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाराणसी मतदार संघानंतर नगर जिल्ह्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून कार्यान्वित झालेली योजना ज्येष्ठ नागरिकांना आधार ठरली आहे. नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत दहा हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून राहाता, लोणी, आश्वी आणि संगमनेर येथील तपासणी शिबिरात सर्वाधिक नोंदणी होईल, असा विश्वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com