ज्येष्ठांना साहित्य देणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान - खा. डॉ. सुजय विखे

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप
ज्येष्ठांना साहित्य देणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान - खा. डॉ. सुजय विखे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबके साथ सबका विकास असे घोषवाक्य घेऊन सुरू केलेले काम लोकमान्य झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले साहित्य वाटप करणारे ते पहिले पंतप्रधान असल्याचा दावा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.

येथील उत्सव मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या साहित्य वाटप प्रसंगी खा. विखे पा. बोलत होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, माजी जि. प. सदस्य शरद नवले, शहराध्यक्ष मारुती बिंगले, नगरसेवक जितेंद्र छाजेड, रवी पाटील, दीपक चव्हाण, गिरीधर आसने, सरपंच बाबा चिडे, गणेश मुदगुले, विठ्ठलराव राऊत, अनिल भनगडे, दीपाली चित्ते, तहसीलदार प्रकाश पाटील उपस्थित होते.

खा. विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली. या योजनेचा निधी यापूर्वी परत जात होता, परंतु आपण प्रत्येक कुटुंबासाठी आपले संपूर्ण आयुष्य झीजविणारे साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक वारसांच्या दुर्लक्षामुळे सुविधांपासून वंचित राहतात. अशा ज्येष्ठ माणसांची सेवा करण्याची ही संधी असल्याचे समजून मी या योजनेत लक्ष घातले. देशासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या योजनेतील 40 कोटी एकट्या अहमदनगर जिल्ह्यासाठी आणले. या योजनेचे साहित्य दिल्लीपासून गावापर्यंत येण्यासाठी वेळ लागला, परंतु ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विखे कुटुंबियावर विश्वास ठेवून प्रतीक्षा केली, त्या सर्वांना साहित्य वाटप करण्याची संधी मिळाली, याचे समाधान आहे.

पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी आयुष्यभर गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. गेल्या 50 वर्षांत विखे परिवाराकडे सत्ता येत-जात राहिली, परंतु आज गरिबांच्या आशिर्वादामुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यात दोन नंबरचे मंत्री झाल्याचे समाधान आहे.

शेती महामंडळाचा प्रश्न सोडविण्यासाठी विखे कुटुंबियांनी मोठे परिश्रम घेतले. परंतु सदरची जमीन वाटपात अनेकांनी जमीन बळकावली आहे. अनेकांनी जमिनीच्या मोबदल्यात खंडणी गोळा केल्या आहेत. ज्यांनी शेतीमहामंडळाची जमीन बळकावली त्यांना सोडणार नाही. ती परत घेतली जाईल, असा इशारा खा. विखे यांनी दिला.

शहरालगतच्या कोट्यवधी रुपयांच्या अनेक जमिनीचे वाटप अद्याप बाकी आहे. शहरालगत बळकावलेल्या जमिनी परत घेऊन शिल्लक जमीन पंतप्रधान आवास योजनेसाठी दिली जाईल, असे ते म्हणाले.

तालुकाध्यक्ष पटारे यांनी प्रास्ताविक केले. श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या विकासात विखे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. ना. विखे मंत्री होताच शहरासाठी 5 कोटींचा निधी दिला. भविष्यात शहरात गोरगरीब जनतेसाठी हॉस्पीटल होणे गरजेचे असून खा. विखे पाटील यांनी दवाखाना उभारावा, असे आवाहन केले.

यावेळी शरद नवले, दीपाली चित्ते, गणेश मुदगुले, विठ्ठल राऊत, अनिल भनगडे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. मारुती बिंगले यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com