खा. डॉ. सुजय विखे
खा. डॉ. सुजय विखे

एमआयडीसीचे आरक्षण टाकून, जागा विकणे म्हणजे विकास नव्हे

खा .डॉ. विखे यांचा पवार-शिंदेंना टोला || सामाजिक शांततेसाठी पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे || कर्जत एमआयडीसीची अवस्था राहुरी, श्रीरामपूरच्या एमआयडीसी सारखी करायची का? || मोबाईलवर बंदी आणणार कायदा आणायला हवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कर्जत एमआयडीसीवरून आधीच दोघांमध्ये वाद सुरू आहेत. हा वाद संपून द्या, दोघांच्या वादात तिसर्‍याने उडी घेतल्यास तो आणखी उफाळून येईल, असे सांगत केवळ एमआयडीसीचे आरक्षण टाकून जागा विकणे म्हणजे विकास नाही. एमआयडीसी मंजूर केल्यावर किती उद्योजक त्याठिकाणी येणार, किती उद्योग व्यवसाय सुरू होणार, त्यातून किती तरूणांना रोजगार मिळणार हे कागदावर बोला, या शब्दांत भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जत-जामखेडचे आजी-माजी आ. रोहित पवार आणि राम शिंदे यांचे कान टोचले.

दरम्यान, नगर जिल्ह्यासह शहरातील कायदा आणि सुव्यवस्था, लवजिहाद, मुले-मुली पळून जाणे, मुलींचे छेडछाड प्रकरण, महापुरूषांबद्दल आक्षेपर्हाय वक्तव्य याला मोबाईल जबाबदारी असून पालकांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे, आपल्या मुलांवर संस्कार करावेत, त्यांच्याकडे लक्ष द्यावेत, अन्यथा येत्या पाच वर्षात सामाजिक शांततेची स्थिती भयंकर होईल, अशी भीतीही खा. डॉ. विखे यांनी यावेळी व्यक्त केली.

नगरमध्ये रेल्वेस्थानकाच्या आधुनिकरणाच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. खा. डॉ. विखे म्हणाले की, कर्जतच्या एमआयडीसीवरून अनेक टीका टिपण्या झालेल्या आहेत. मात्र, आ. पवार आणि आ. शिंदे यापैकी कोणीच मुद्द्यावर बोलत नाही. एमआयडीसी कोणी आणि कधी मंजूर केली हा चर्चेचा मुद्दा नाही. मात्र, एमआयडीसी मंजूर झाल्यावर त्याठिकाणी औद्योगिक विकास करण्यासाठी किती उद्योजक पुढे आले आणि त्याठिकाणी आम्ही व्यवसाय सुरू करणार यावर कोणीच बोलत नाही. केवळ एमआयडीसी मंजूर करून त्याठिकाणी जागा विकणे म्हणजे विकास नाही. कर्जत एमआयडीसीची अवस्था राहुरी, श्रीरामपूरच्या एमआयडीसी सारखी करायची का? असा सवाल करत जोपर्यंत उद्योग व्यवसाय सुरू होणार नाहीत, तोपर्यंत तरूणांना फायदा होणार नसल्याचे खा. डॉ. विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगर जिल्ह्यासह शहरातील ढासाळालेली कायदा-सुव्यवस्था, मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण, लव्ह जिहाद याला मोबाईल जबाबदार आहे. यामुळे लवकरच मोबाईलवर बंदी आणणार कायदा आणायला हवा, अशी मागणी खा. विखे पाटील यांनी यावेळी केली. त्याच सोबत उदरनिर्वाहासोबत पालकांनी आपल्या मुला-मुलींकडे लक्ष द्यावेत, त्यांच्यावर संस्कार करावेत, अन्यथा येत्या पाच वर्षात सामाजिक शांततेची स्थिती भयंकर होणार असल्याची भिती व्यक्त करत याला आजची विभक्त कुटूंब व्यवस्था देखील कारणीभूत त्याचे मत व्यक्त केले.

तर रोहित पवार स्पीकरच्या जागी...!

अधिवेशनात तरूणांना बोलण्यास कमी संधी मिळाली, या आ. रोहित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना, यंदाच्या अधिवेशात सगळ्यात जास्त आ. पवारच बोलले. ते थोडे अजून जास्त बोलले असते तर त्यांना स्पीकरच्या जागी बसवावे लागले असते, अशी खोचक टीका करत खा. डॉ. विखे म्हणाले, अधिवेशात रोहित पवार यांनी जेवढा कॅमेरा कॅप्चर केला, तेवढा कोणीच केला नाही. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते, त्याप्रमाणे ते बोलत असतात. असे होत नाही की सगळे युवा आमदार चांगले आणि सर्व ज्येष्ठ आमदार वाईट. वैचारिकता, संस्कृती, सुसंस्कृतपणा, परिवाराचा वारसा आणि लोकांची विश्वासहर्ता अशा अनेक गोष्टींचा समतोल साधून जनता लोकप्रतिनिधींना निवडून देत असते. प्रत्येकाला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार असून मिळालेल्या संधीनुसार काम न केल्यास जनता पुढील वेळेस बदल करते, यामळे युवकांनीच निवडणूका लढवल्या पाहिजेत, या मताशी मी सहमत नाही, असे खा. डॉ. विखे यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com