खा. डॉ. विखेंनी मागितली (स्व.) राठोड यांची माफी

उड्डाण पुलाचेही दिले श्रेय
खा. डॉ. सुजय विखे
खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात होत असलेल्या उड्डाणपुलासाठी माजी आमदार (स्व.) अनिल राठोड व माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी या दोघांचेही योगदान आहे. या पुलासाठी योगदान देणारांची नावे घेताना त्या दिवशी (स्व.) राठोड़ यांचे नाव घेण्यास मी विसरलो व त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे मनमोकळे स्पष्टीकरण नगर दक्षिणेचे भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांनी मंगळवारी येथे दिले. दरम्यान, 19 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन झाल्यावर सक्कर चौकातील ओम गार्डनमध्ये सभा होईल व त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता उड्डाण पुलावर फायर शो (फटाक्यांची आतषबाजी) होईल, असेही खा. विखेंनी स्पष्ट केले.

आठ दिवसांपूर्वी खा. डॉ. विखे यांनी शहराचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्यासमवेत उड्डाण पुलाची पाहणी केली होती.त्यावेळी त्यांनी या पुलाच्या कामाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ. जगताप व माजी खा. (स्व.) दिलीप गांधी यांना दिले होते. यावेळी शिवसेनेचे शहराचे माजी आमदार (स्व.) राठोड यांचे नाव खा. विखेंनी घेतले नसल्याने स्थानिक शिवसेनेतील ठाकरे सेनेने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

(स्व.) राठोड यांच्यामुळे तुम्ही खासदार झाले आहात, पण तुम्ही त्यांचे नाव विसरले असले तरी आम्ही विसरणार नाही, असा सूचक इशारा ठाकरे सेनेने सोशल मीडियातून दिला होता व त्यानंतर दुसर्‍या दिवशी उड्डाण पुलावर जाऊन पुलाच्या उद्घाटनाचा नारळ ही फोडला होता. यावेळीही खा. विखेंवर सूचक टीका केली गेली होती. यापार्श्वभूमीवर खा. विखे यांनी भूमिका मांडताना स्व. राठोड यांचे नाव विसरल्याचे कबूल करून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पुलाचे काम होण्यात राठोड यांचेही मोठे योगदान असून, त्यांनीही या पुलासाठी त्याग केलेला आहे, असेही आवर्जून स्पष्ट केले.

श्रेय नामावलीत मी शेवटी

उड्डाण पुलाची अनेकजण पाहणी करीत असल्याने ते चांगले आहे. कारण, आता पुलाचे काम संपले आहे. त्याचे श्रेय सर्वांना द्यायला हवे. राठोड व दिलीप गांधी यांच्यासह सर्व नगरसेवकांनाही श्रेय आहे. या श्रेयनामावलीत मी शेवटी आहे, शेवटचे श्रेय माझे आहे, असे स्पष्ट करून खा. विखे म्हणाले, माझ्या राजकीय वाटचालीत लोकसभा निवडणुकीच्यावेळी माझ्या खांद्याला खांदा लावून स्व. राठोड माझ्या पाठीशी उभे होते. कामाच्या गडबड़ीत मी त्यांचे नाव घेण्याचे विसरलो. ज्यांनी पुलासाठी त्याग केला, त्यांना मी विसरणार नाही व पुलासाठी स्व. राठोड यांचेही मोठे योगदान आहे, असेही खा. डॉ. विखे यांनी आवर्जून स्पष्ट केले. दरम्यान, पुलाच्या खांबांवरील शिवचरित्राचे तसेच मार्केट यार्ड चौकातील खांबांना वडाच्या झाडाचे रुप देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. चांदणी चौकात या पुलाखालील अ‍ॅम्पी थिएटर व अन्य कामेही लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुलाला अहमदनगर शहराचेच नाव

केंद्र सरकारच्या निधीतून होणारे रस्ते वा पुलांना नाव देण्याची प्रथा नाही व तशी नॅशनल अ‍ॅथॉरिटीकडून परवानगीही नसते. त्यामुळे नगरच्या उड्डाण पुलाला कोणाचे नाव द्यायचे असेल तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे लेखी मागणी करावी लागेल व त्यावर अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असे स्पष्ट करून खा. डॉ. विखे म्हणाले, हा उड्डाण पूल अहमदनगर शहरात होत असल्याने या पुलाला अहमदनगर उड्डाण पूल असे जिल्ह्याचे नाव देण्यात काही वाईट नाही. पण पुलाचे नाव काय असावे, याबाबत माझे कशाला समर्थनही नाही व विरोधही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, या पुलाला 86 खांब असल्याने या सर्व खांबांना महापुरुषांची नावे दिली तरी माझी हरकत नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com