माझा कोणत्याच नावाला विरोध नाही, मात्र नामांतर सर्वानुमते निर्णयानुसार व्हावे

माझा कोणत्याच नावाला विरोध नाही, मात्र नामांतर सर्वानुमते निर्णयानुसार व्हावे

खा. डॉ. विखे पाटील यांची अहिल्यादेवी होळकर नामांतर विषयावर भूमिका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे. नामांतराबाबत अनेक मतप्रवाह आहेत. विधानसभेतही या विषयावर चर्चा झालेली आहे. राज्य सरकार त्यादृष्टीने कार्यवाही करत आहे. धनगर समाजाच्यावतीने नामांतराच्या मुद्द्यावर अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर यात्राही काढण्यात आली आहे.

याबाबत मी जाहीर भूमिका स्पष्ट केली होती. सर्वानुमते निर्णयानुसार नगरचे नामांतर करण्यास माझा पाठिंबा राहणार आहे. कोणत्याही नावाला माझा विरोध नव्हता व नाही. मात्र, सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, त्यासाठी मी पुढाकार घेईल, असे आश्वासन नगर दक्षिणेचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

धनगर समाज सेवा संघ अहमदनगरच्यावतीने रविवारी नगरला राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मार्गदर्शन करतांना खा.डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी आ. अ‍ॅड. रामहरी रुपनर, मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र तागड, प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, इंजिनिअर रंगनाथ भोंडवे, दत्तात्रय गावडे, निशांत दातीर, वसंतराव दातीर, सोपान राहींज आदी उपस्थित होते.

यावेळी खा. डॉ. विखे म्हणाले, धनगर समाजाच्या उन्नत्ती आणि प्रगतीसाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजातील संघटनांनी प्रयत्न करावेत. आजच्या वधू-वर मेळाव्या माध्यमातून समाजाचे होत असलेले संघठन हे कौतुकास्पद असेच आहे. संघटनेशिवाय कोणतही कृती प्रत्यक्षात येत नाही. त्यासाठी समाजाने संघठन मजबूत करुन समाजाचा विकास साधावा, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिष्ठानच्या सभामंडप व इतर विकास कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यानी केली.

यावेळी आ. रामहरी रुपनर, म्हणाले धनगर समाजाचा इतिहास आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे. अहमदनगर जिल्हाला त्यांचे नाव देण्याचा प्रास्ताव आहे, नामांतर होण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही समाजाच्यादृष्टीने गौरवास्पद बाब आहे. नामांतरानंतर जगाच्या पटलावर नगरचे नाव अहिल्याबाई होळकर म्हणून कोरले जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.

वधू-वर मेळाव्यात जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातीलही वधू-वर, पालक उपस्थित होते. वधू-वर नोंदणी पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या समाजातील मान्यवरांचाही गौरव मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com