श्रीरामपूरच्या राजकारणात रस नाही

ना आम्हाला नगराध्यक्ष व्हायचे, ना आमदार- खा. विखे
श्रीरामपूरच्या राजकारणात रस नाही

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

ज्या तालुक्याने कै. बाळासाहेब विखे पा. यांना मताधिक्य देवून खासदार केले त्या तालुक्याला आम्ही वार्‍यावर सोडूच शकणार नाही. ही आमची नैतिकता नाही. जोपर्यंत या तालुक्यात सक्षम नेतृत्व मिळत नाही तोपर्यंत राजकीय हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. तालुक्यात अस्थिर राजकारण असते तेव्हा सर्वसामान्य जनता भरकटली जाते. आम्हाला या तालुक्याच्या सत्तासंघर्षात, राजकारणात रस नाही, ना आम्हाला नगराध्यक्ष व्हायचे ना या तालुक्यात आमदार व्हायचे. या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी, शेतकर्‍यांची एक वेगळाच ऋणानुबंध आमच्या विखे कुटुंबाचा राहिलेला आहे. आणि अशा शेतकर्‍यांना आणि कार्यकर्त्यांना आम्ही वार्‍यावर सोडणार नाही, अशी स्पष्टोक्ती खा. सुजय विखे पा. यांनी दिली.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा मार्केटचा शुभारंभ तसेच भाजीपाला कांदा मार्केट काँक्रिटीकरण रस्त्याचा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, सभापती संगीताताई शिंदे, प्रकाश चित्ते, उपसभापती नितीन भागडे, शरद नवले, नानासाहेब शिंदे, संचालक राधाकृष्ण आहेर, जितेंद्र गदिया, सोन्याबापू शिंदे, मनोज हिवराळे, कैलास बोर्डे, संगीता शिंदे, बाळासाहेब तोरणे, संगिता गांगुर्डे, वैशाली मोरे, कल्याणी कानडे, मुक्ताजी फटांगरे, जितेंद्र छाजेड, मारुती बिंगले, गणेश मुदगुले, गिरीधर आसने, विठ्ठल पवार आदी उपस्थित होते.

खा. विखे म्हणाले, अनेक आरोप प्रत्यारोप आमच्यावर होत असतात, राजकीय हस्तक्षेपाबद्दल बोलले जाते. ज्या ज्यावेळी या तालुक्यात संकटे येतात त्यावेळी विखे पा. कुटुंबाने मदतीचा हात पुढे केला आहे. करोनाचा काळ असेल, अन्नछत्र सुरु करण्याचा निर्णयात श्रीरामपूरचा समावेश घेतला. ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजनेची सुरुवात आपण श्रीरामपूरपासून केली, यास असंख्य प्रश्न श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचे व सर्वसामान्य गरिबांचे असतील त्यावेळी विखे कुुटुंबाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज राहुरी कारखाना चालला नसता तर आज अशोकची तसेच शेतकर्‍यांची काय अवस्था झाली असती.

जवळपास दीड लाख टन अशोक कार्यक्षेत्राचा गाळप हा राहुरी कारखान्याने केला. या प्रत्येक संकटाच्या कालावधीत विखे पा.कुटुंबिय श्रीरामपूच्या शेतकर्‍यांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रत्येक गोरगरिब नागरिकांच्या मदतीसाठी येत असेल तर हा आक्षेप घेण्याचे कारण काय? या तालुक्यातील गोरगरीब जनतेला, शेतकर्‍याला कोणी वाली राहिलेला नाही. तुम्ही सक्षम नेतृत्व द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. तालुक्यात सक्षम नेतृत्व नसेल, गोरगरीब तसेच शेतकर्‍यांचा आवाज उठविण्यासाठी कोणी नसेल तर कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल.

आम्ही कुठल्याही पक्षात गेलो आम्ही एकटेच असतो, काँगेसमध्ये होतो त्यावेळी पक्षविरोधी काम करतो असा आरोप केला. आज भाजपात आहे तरी तसेच बोलले जाते. या आरोपापेक्षा आम्हाला आमचा कार्यकर्ता महत्वाचा असतो. जो माणूस आपल्यासाठी काठी हातात घेईल तोच माणूस विखे कुटुंबियांसाठी महत्वाचा असेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे यांचेही भाषण झाले. सुत्रसंचलन बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी केले.

कांद्यासाठी किसान रेल्वे सुुरु करणार

नाशिक जिल्ह्यापेक्षा नगर जिल्ह्यात दुपटीने आणि चांगल्या कांद्याचे उत्पादन होत असते. नगर जिल्ह्यात 1 लाख हेक्टर कांद्याची लागवड होत असते. तरीही नगर जिल्ह्यातील कांद्याला चांगला भाव मिळत्त नाही. नाशिक जिल्ह्यातील कांद्याची वाहतूक ही रेल्वेने होत असते. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात कांद्याच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वे येत्या सहा महिन्याच्या आत सुरु करणार आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या वाहतुकीचे 3 रुपये वाचले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी शिवसेनेला दोन वर्षांत संपविणार.

एकीकडे नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या घरी येणार म्हणून एक खासदार मातोश्रीवर राखण करत वडेपाव खात बसतो, संपूर्ण शिवसेना आज रस्त्यावर आली आहे. आणि दुसरीकडे त्याचा मित्रपक्ष राष्ट्रवादी कोल्हापूरात पक्षवाढीसाठी मेळावे घेत आहे. अशी अस्थिर परिस्थिती असताना राष्ट्रवादीने पक्षवाढी मेळावे घेण्यापेक्षा शिवसेनेला साथ देवून हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत असे म्हणण्याची दानत या राष्ट्रवादीच्या एकाकडेही नाही. मात्र स्व. बाळासाहेब ठाकरे असतानाही आम्ही शिवसनेला मानत होतो आज भाजपाचा खासदार असतानाही शिवसेनेबद्दल चांगलेच मत व्यक्त करतो. परंतु राष्ट्रवादी अशा प्रकारचे राजकारण करुन या दोन वर्षात शिवसेनेला संपवून दोन स्वतंत्रपणे निवडणूक लढवून स्वतःचा मुख्यमंत्री बसविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पुढच्या पिढीने राजकारणात येऊ नये

राजकारण हा नशिबाचा खेळ आहे, तुमच्या कर्तृत्वाचा नाही, तुमच्या मेहनतीचा नाही, तुमच्या संघर्षाचा नाही, लॉटरी सिस्टम आहे. आणि म्हणून पुढच्या पिढील सांगतो की, अजिबात राजकारणात येऊ नका. तुमच्या अकलेचे, तुमच्या कौशल्याचे, हुशारीचे मुल्यमापन तुमच्या पदाशी कधीच होऊ शकत नाही. तुम्ही जेवढे अकार्यक्षम असाल, जेवढे सेटींग करणारे असाल, मॅनेज होणारे असतील तेवढे तुमचे पद मोठे हीच राजकारणाची सत्यता आहे, ही आजपासून नाही तर स्व. बाळासाहेब विखें पासून, राधाकृष्ण विखेंपासून ते सुजय विखे यांच्यापर्यंत हा प्रवास चालू आहे.

विखे पा. यांच्या कुटुंबातील कोणीतरी यावे आणि या तालुक्याचे नेतृत्व करावं हे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अजूनही आहे. हे सुजय विखे किंवा राधाकृष्ण विखे बोलत नाहीत. घरात आमच्यात चार लोक आहे त्यात एक खासदार आहे, एक आमदार आहे, एक जि. प. सदस्य आहेत तर एखाद घरी तर असू द्या, जेणे करुन मुलाबाळांकडे शेतीकडे लक्ष देईल. असे सांगून धनश्रीताई श्रीरामपूरच्या राजकारणात येण्याला पूर्णविराम दिला.

खा. विखे यांचे आ. कानडे यांना आव्हान

शिर्डी विधानसभा मतदार संघात आ. राधाकृष्ण विखे पा. यांनी शेतकर्‍यांच्या मोटारी वारंवार जळत असल्यामुळे तालुक्यात स्वतःचा आमदार निधीतील साडेसात कोटी रुपयांचा निधी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी एमएसईबीला दिला आहे. शेतकर्‍यांसाठी एक आदर्श असे काम केले आहे. त्याचप्रमाणे आ. लहू कानडे यांनीही श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांसाठी स्वतःचा निधी देऊन अशा प्रकारचे काम करुन दाखवावे ,असे आव्हान खा. सुजय विखे यांनी आ. लहू कानडे यांना दिले आहे.

अशी नगरपालिकाच पाहिलेली नाही !

या नगरपालिकेत तर.. हात जोडले, अशी नगरपालिकाच पाहिलेली नाही, कोण कोणाबरोबर निवडणूक लढवतो, त्याच्याबरोबर निवडून येतो आणि त्याच्यावर अविश्वास दाखवतो, आणि आपल्याकडे येतो. दुसरीकडे आमच्या विरोधात बोलतो तर एकीकडे आमच्या गाडीत कधी येवून बसतो हे कळतच नाही. असे अस्थिर राजकारण नको रे बाबा म्हणून त्यांनी हात जोडले.

Related Stories

No stories found.