खा. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम यशस्वी करू - नामदेवराव ढोकणे

डॉ. तनपुरे कारखान्याचा बॉयलर व रोलर पूजन सोहळा संपन्न
खा. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम यशस्वी करू - नामदेवराव ढोकणे

राहुरी फॅक्टरी/उंबरे |वार्ताहर| Rahuri Factory

येत्या गळीत हंगामामध्ये पाच ते सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून डॉ. तनपुरे कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न कारखान्याचे मार्गदर्शक खा.डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाईल, ऊस उत्पादक व सभासद यांनी दिलेल्या उसाला इतर कारखान्यांच्या बरोबरीने चांगला भाव दिला जाईल याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे, असे प्रतिपादन डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी केले आहे.

राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या व खा. डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखालील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 चा 61 व्या गळीत हंगामाचा विधिवत रोलर पूजन व बॉयलर अग्निप्रदीपन पूजन सोहळा सोमवार दि. 18 रोजी सकाळी साडेनऊ वाजता कारखाना कार्यस्थळावर पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे होते.

यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याच्या गळीत हंगामाचा रोलर पूजन सोहळा देवळाली प्रवरा शहराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, बाबासाहेब देशमुख, साहेबराव म्हसे, प्रफुल्ल शेळके, यशवंत ताकटे, लक्ष्मण आढाव यांच्या हस्ते तर बॉयलर अग्निप्रदीपन पूजन सोहळा किशोरराव वने, सौ. सुजाताताई वने, विक्रम तांबे, सौ.सुनीताताई तांबे, सुभाष उंडे, सौ. प्रतिभाताई उंडे, युवराज गाडे, सौ.स्वातीताई गाडे, बाळासाहेब खुरूद, सौ. मनीषाताई खुरूद यांच्या हस्ते संपन्न झाला तर देवी देवता पूजन विवेकानंद नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, बाळकृष्ण बानकर यांच्याहस्ते पार पडले.

यावेळी ढोकणे यांनी सांगितले, कारखाना सुरू होतो की नाही? कारखाना सुरू करण्यास परवानगी मिळते की नाही ? याबाबत साशंकता होती. मात्र आता सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. पुढील महिन्यामध्ये वेळेत गळीत हंगाम सुरू होईल. ऊस उत्पादकांनी आपला ऊस तालुक्याच्या या कामधेनूलाच द्यावा, त्यांच्या उसाला योग्य भाव दिला जाईल. कामगारांनी डोळ्यात तेल घालून काम करावे, पगार मागणे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यांचे देणे देण्यास बांधील आहोत. मात्र, सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. कारखाना यावर्षी पाच ते सहा लाख टन ऊस गाळप करून या आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारखान्याचे मेंटेनन्सची कामे 90 टक्के पूर्ण झालेली आहेत.

उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यासाठी कामगार प्रयत्नशील आहेत. तालुक्यात यावर्षी प्रचंड ऊस आहे दररोज किमान साडेचार हजार मेट्रिक टन ऊस तोड करून गाळप करण्याचा मानस आहे. या गळीत हंगामामध्ये ज्या शेतकर्‍यांनी 2 ऑगस्ट 2021 अखेर ऊस पुरवठा केलेला आहे अशा शेतकर्‍यांचे रुपये 2100 प्रमाणे उसाचे पेमेंट करण्यात आलेले आहे. उर्वरित शेतकर्‍यांचे पेमेंट वाटप सुरू आहे. लवकरच सर्व शेतकर्‍यांचे उसाचे पेमेंट दिले जाईल ही कामधेनू यशस्वीरित्या चालू राहावी याकरिता राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस याच कारखान्यास द्यावा, असे अवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रास्ताविकात माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले, गेली पाच वर्षापासून अतिशय खडतर कालावधीमध्ये वाटचाल करीत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र, खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तीन गळीत हंगामा मध्ये कारखाना सुरू करण्यात आला. तालुक्यामध्ये उसाचे मोठे क्षेत्र उभे आहे. कारखाना सुरू झाला नाही तर या ऊस उत्पादक व सभासदांचे मोठे नुकसान झाले असते. कामधेनू उर्जितावस्थेमध्ये आणण्यासाठी कामगार, सभासद ,ऊस उत्पादक यांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे.

कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, माजी उपाध्यक्ष शामराव निमसे, कारखान्याचे संचालक मच्छिंद्र तांबे, बाळकृष्ण कोळसे, केशवराव कोळसे, अशोक खुरूद, मधुकर पवार, रवींद्र म्हसे, विजय डौले, उत्तमराव आढाव, शिवाजी सयाजी गाडे, नंदकुमार डोळस, अर्जुन बाचकर, महेश पाटील, सुभाष वराळे, गोरक्षनाथ तारडे, डॉ. पंकज चौधरी, संचालिका हिराबाई चौधरी, पार्वतीबाई तारडे, प्र. कार्यकारी संचालक बी.एन. सरोदे, पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, मुळा प्रवराचे संचालक आर. आर. तनपुरे, ज्ञानदेव आहेर आदींसह सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केले तर आभार संचालक सुरसिंगराव पवार यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com