कोल्हार येथे खा. सुजय विखेंनी केली महामार्गाची पाहणी

जाणून घेतल्या कोल्हारकरांच्या समस्या
कोल्हार येथे खा. सुजय विखेंनी केली महामार्गाची पाहणी

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

नगर-मनमाड महामार्गाच्या साईड गटार नाल्यांचे काम सुरू आहे. त्यासंबंधी कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर, तिसगाव प्रवरा, कोल्हार खुर्द, चिंचोली येथील शेतकर्‍यांच्या अडचणींसंदर्भात काही मागण्या होत्या. त्याअनुषंगाने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत कोल्हार येथे महामार्गाच्या कामावर समक्ष येऊन पाहणी केली. आढावा घेतला. शेतकर्‍यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. या सर्व समस्यांची विशेषतः शेतातील पाण्याच्या विल्हेवाटीचे नियोजन कसे करता येईल यावर सकारात्मक उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले.

काल रविवारी सकाळी त्यांनी हा पाहणी दौरा केला. यामध्ये त्यांनी कोल्हार खुर्द येथील साई ध्यान मंदिर, कोल्हार बुद्रुक येथील आनंद ऋषीजी चौक, नेमबाई माता मंदिर, नवाळे वस्ती येथे भेट देऊन नागरिकांच्या संभाव्य अडचणींचा गोषवारा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे टीम लीडर महेश मिश्रा, जनरल मॅनेजर रमेश गाढवे, राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता दिग्विजय पाटणकर व एम. एम. सय्यद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता जी. डी. सुर्यवंशी, उप अभियंता एस. बी. वसईकर उपस्थित होते.

नेमबाई माता मंदिराजवळ शेतकर्‍यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, शेतकर्‍यांचे शेतातील पावसाळ्यातील पाण्याच्या विल्हेवाटीचे प्रश्न आहेत. शेतीच्या पाण्याला दिशा मिळाली पाहिजे. हे पाणी निघायला नदी हा एकमेव पर्याय आहे. नदीपर्यंत पाणी वाहण्यासाठी काँक्रीट गटार हा सर्वोत्तम पर्याय आहे. म्हणून ज्या ठिकाणी शेतीच्या पाण्याची लेव्हल आणि साईड गटारीच्या पाण्याची लेव्हल खाली येऊन समतल येईल, त्याजागी शेतीचे पाणी वळवून साईड गटारातून पुढे काढून देऊ. त्या भागाला जाळी लावली जाईल. जेणेकरून शेतातील माती, कचरा नालीत जाणार नाही.

महामार्गाच्या साईड गटाराला खेटून शेतकर्‍यांनी चर किंवा बंदिस्त नाली केली तर हा विषय कायमचा संपून जाईल. त्याचा डिझाईन आम्ही त्यांना काढून देऊ. जेवढे ओढे-नाले असतील, शेतकर्‍यांनी जर परवानगी दिली तर शेतीच्या पाण्यासाठी जी नाली करायची आहे, ती करून दिली जाईल. यातून शेतकर्‍यांचा पाण्याचा विल्हेवाटीचा प्रश्न सुटेल आणि रस्ताही चांगल्या पद्धतीने काँक्रीट होईल, असे खा. डॉ. विखे पाटील म्हणाले.

रोड एक्सेस होण्यासाठी जिथे साईट गटारीचा स्लॅब अजून पडला नाही, तेथे तो स्लॅब रोड लेव्हलला घेतला जाईल. ज्यामुळे रस्त्याकडेच्या वस्त्यांवरील आणि शेतातील दळणवळणाचा प्रश्न सुटेल. महामार्गाची उंची वाढविली तरच तो रस्ता दीर्घकाळ टिकू शकतो. या भागात दर एक किलोमीटर अंतरावर रस्त्याखालून आडवे पाईप टाकून देऊ. जेणेकरून शेतकर्‍यांना सोयीस्कर होईल.नगर-मनमाड महामार्ग होत असतांना तो जास्तीत जास्त काँक्रिटीकरण करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले आहेत. जेणेकरून रस्ता खराब होणार नाही, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

कोल्हार बुद्रुक येथील आनंदऋषीजी चौकामध्ये जोडल्या जाणार्‍या बेलापूर रस्ता, राजुरी रस्ता, देवीच्या कमानीतून येणारा रस्ता आदी रस्त्यांना रॅम्प करून त्यांचा स्लोप महामार्गाच्या उंचीला जास्तीत जास्त समतल केला जाईल. त्याचप्रमाणे या सर्व रस्त्यांच्या कडेने येणारे शेतीच्या पाण्याचे पाईपलाईनद्वारे नियोजन करून ते पाणी नदीत कसे सोडता येईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

या चौकात भुयारी मार्ग काढला जाऊ नये अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. खा. विखे पा. यावेळी म्हणाले, कोल्हार गावामध्ये महामार्गाचे काम जेथून जाणार आहे तेथे अधिकार्‍यांनी आखणी करून घ्यावी. जेणेकरून गावातील रस्त्याकडेची दुकाने त्या आखणी केलेल्या रेषेपासून त्यांच्याकडून मागे सरकावून घेतले जातील.

कोल्हार येथील सध्याच्या पुलाची उंची अधिक झाल्याने उसाच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर पुलावर चढताना अडचणी येतात. त्यासाठी या पुलाला समांतर आणखी एक कमी उंचीचा नवीन पूल केला जात आहे. कोल्हार खुर्दमध्ये व्यवस्थित भुयारी मार्ग करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे विखे पा. म्हणाले. चिंचोली येथील चौकात सर्कल करण्याची मागणी यावेळी तेथील ग्रामस्थांनी केली.

कोल्हार खुर्द येथील साई ध्यान मंदिराजवळ डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, या महामार्गाच्या बाबतीत अनेक लोक वेगवेगळी निवेदने देऊन कामाला अडथळे आणताना दिसून येतात. ज्यांना अडचणी असतील त्यांनी खासदार या नात्याने मला संपर्क करावा. आम्ही अडचणी सोडविण्यासाठीच आहोत. तहसिलदारांना निवेदन देत बसू नका. अवास्तव मागण्या करून काही विशिष्ट हेतू डोक्यात ठेवून हेतुपुरस्सरपणे महामार्गाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com