श्रीरामपूर (प्रतिनधिी) -

श्रीरामपूर-बेलापूर रस्ता चौपदरीकरणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. रस्त्यालगतचे अतिक्रण काढण्यासाठी सोमवार

दि.22 फेब्रुवारी 2021 पासून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम येत्या मार्च महिन्यापासून सुरु होणार आहे.

कोपरगाव (झगडेफाटा) ते राहुरी फॅक्टरी या राज्य मार्ग क्र. 36 चे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून प्रस्तावित असला तरी त्यासाठी निधी उपलब्द नसल्याने काम रेंगाळले होते. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यात श्रीरामपूर शहर हद्दीवरील वेशीपासून पुढे दोन किलोमिटर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु होणार आहे.

या रस्त्याचे दोन्ही बाजुने 15 मिटरचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यात रस्त्याच्या मध्यभागी साडेतीन फुटाचा दुभाजक आहे. या रस्त्यावर वेशीपासून पुढे मोठ्या प्रमणावर अतिक्रमण झाले आहे. अनेक व्यावसायिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर पक्की तसेच काहींनी लोखंडी पत्र्यांची गाळे तयार करून अतिक्रमण केले आहे. त्यांचा व्यावसाय रस्तालगत चालत असल्याने रस्ता अतिशय अरूंद झाला आहे. त्यामुळे रस्तावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे काम सुरु करण्यापूर्वी हे अतिक्रमण काढावे लागणार आहे. ते काढण्यासाठी येत्या सोमवार दि.22 फेब्रुवारी 2021 पासून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात येणार आहे.

येत्या मार्च महिन्यापासून कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार असल्याने हे अतिक्रमण तातडीने काढले जाणार आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.

सरकारी जागेची खुलेआम विक्री

या रस्तालगत पूर्वी केवळ रहिवासी अतिक्रमण होते. परंतू गेल्या काही दिवसांपासून या अतिक्रण केलेल्या जागा विकत घेवून त्याठिकाणी व्यावसाय थाटले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या अतिक्रमणात मोठ्या प्रमणावर वाढ झाली आहे. दोन ते चार लाखापर्यंत या जागांची खरेदी-विक्री होत आहे. आता या अतिक्रमणावर ‘हातोडा’ पडणार असल्याने जागा खरेदीसाठी पैसे खर्च करणारांचे धाबे दणाणले आहेत.